मुंबई, दि. १८ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथसंग्रहालयाला भेट देऊन ग्रंथसंपदा, दुर्मिळ दस्तावेज, सोपारा येथील अवशेष, नकाशे व दुर्मिळ नाण्यांची पाहणी केली. यावेळी राज्यपालांनी एशियाटिक सोसायटीला ग्रंथ जतन व संवर्धन कार्यासाठी २० लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
एशियाटिकला भेट देऊन अतिशय आनंद झाला असे सांगून येथील ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांना सुपूर्द करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांकडे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. नव्या पिढीला येथे कसे आकर्षित करता येईल या दृष्टीने चिंतन झाले पाहिजे असे सांगताना एशियाटिक ही सजीव व गतिमान संस्था झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. केवळ गीत, नृत्य व नाट्य म्हणजे संस्कृती नसून ऐतिहासिक ग्रंथसंपदा देखील संस्कृतीचा भाग असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

‘विकसित भारत’ म्हणजे केवळ आर्थिक विकास नसून ‘विकसित’ म्हणजे विकास व विरासत – ऐतिहासिक ठेवा – असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथ परिरक्षण हे केवळ ९ ते ६ या कार्यालयीन वेळेत करावयाचे काम नसून त्यासाठी ध्यास व समर्पण भावना हवी असते असे सांगून एशियाटिक सोसायटीमध्ये हे कार्य उत्तम सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्रिपुरा संबंधी ‘राजरत्नाकरम‘ ग्रंथ मुंबईत पाहिला !
त्रिपुरा राज्य व तेथील राजघराण्यांसंबंधी ‘राजरत्नाकरम’ या संस्कृत ग्रंथाबद्दल त्रिपुरात पुष्कळ चर्चा होते. प्रत्यक्षात तो ग्रंथ तेथे कुणीच पाहिला नाही. तो ग्रंथ आज प्रथमच आपण एशियाटिक ग्रंथालयात पाहिला याचा खूप अभिमान वाटतो असे राज्यपालांनी सांगितले. ग्रंथाची प्रत आपणांस भेट देऊ असे डॉ विनय सहस्रबुद्धे यांनी राज्यपालांना सांगितले. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच नवनिर्वाचित व्यवस्थापकीय समितीच्या व छाननी समितीच्या सदस्यांची ओळख करून दिली. यावेळी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरू व उपाध्यक्ष डॉ संजय देशमुख, पदाधिकारी विवेक गणपुले, राजेश बेहरे, सुरेंद्र कुलकर्णी, माधव भंडारी आदी उपस्थित होते. वैजयंती चक्रवर्ती यांनी आभार प्रदर्शन केले.
0000









WhatsApp