मुंबई, दि.१९ : ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ ही गर्भवती व स्तनदा महिलांचे पोषण व आरोग्य सुधारण्यास, प्रसूतीपूर्व तपासणी व बालकाच्या लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ₹५,००० आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास ₹६,००० आर्थिक लाभ देण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ४ हजार ६७६ लाभार्थ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात १६ हजार ७०८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहेत.
पात्र महिलेने जवळच्या अंगणवाडी किंवा उप-आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करून आवश्यक तपासण्या व लसीकरणाची पूर्तता केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.
गर्भधारणेदरम्यान महिलांचे पोषण व आरोग्य सुनिश्चित करणे. गर्भवती महिलांना वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणी करण्यास प्रोत्साहित करणे. बालकाच्या जन्मानंतर आवश्यक लसीकरणास प्रोत्साहन देणे. माता व बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक शासकीय सेवांचा लाभ मिळवून देणे ही ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजने’ची उद्दिष्टे आहेत.
या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ₹ ५,०००/- पहिला हप्ता ₹३,०००/- गर्भधारणेची नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार देण्यात येतो. दुसरा हप्ता ₹२,०००/- देण्यात येतो. बालकाचा जन्म नोंदणी झाल्यानंतर तसेच निर्धारित कालावधीत आवश्यक लसीकरण पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार दुसरा हप्ता देण्यात येतो. तसेच, दुसरे अपत्य मुलगी असल्यास, बालकाच्या जन्म नोंदणीनंतर व निर्धारित लसीकरणाची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थीस ₹६,०००/- एकरकमी आर्थिक लाभ देण्यात येतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र गर्भवती महिलेने आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा उप-आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करावी. बँक खात्याची खात्री करणे आवश्यक असून, लाभार्थीचे स्वतःचे बँक खाते उपलब्ध असून ते डीबीटी साठी कार्यरत आहे व एनपीसीआय शी जोडलेले आहे, याची खात्री करावी.
तसेच, लाभार्थी महिलेचे माता व बाल संरक्षण कार्ड, आधार कार्ड, पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. बँक खाते तपशील / डीबीटीसाठी आवश्यक माहिती तसेच पात्रतेनुसार इतर यामध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रमाणपत्र, आर्थिक किंवा पूर्णपणे अपंगत्व प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, ई-श्रम कार्ड, किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी असल्यास उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
गर्भवती / स्तनदा माता, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक किंवा आशा सेविका असल्यास संबंधित पुरावा किंवा भारत सरकारने अधिसूचित केलेल्या इतर कोणत्याही श्रेणी / दस्तऐवजांपैकी लागू असलेले कागदपत्र असणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुंबई शहर जिल्ह्यात ५ हजार ५५६ लाभार्थींना ₹२ कोटी १० लाख ८७ हजार इतका लाभ वितरित करण्यात आला. मुंबई शहर जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ४ हजार ६७६ लाभार्थी नोंदविण्यात आले आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७ हजार ९३४ लाभार्थींना ₹२ कोटी ९० लाख ३६ हजार आर्थिक लाभ देण्यात आला. २०२६-२७ मध्ये आतापर्यंत १६ हजार ७०८ लाभार्थी नोंदविण्यात आले आहेत. जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत नोंदणी करून पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ









WhatsApp