अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित व्हावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

- Advertisement -


मुंबई, दि. १ : देशात झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने भविष्यातील नागरी प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंधेरी, मुंबई येथील सभागृहात सोमवारी (३१ ऑगस्ट) आयोजित पदवीदान समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते. १९२६ मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. नागरी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, कर्मचारी अधिकारी क्षमता वर्धन, कौशल्य विकास आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले शहरांची वाढती लोकसंख्या आणि बदलत्या गरजा लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  मोठी जबाबदारी आहे.

भारतामध्ये वेगाने नागरीकरण होत आहे. आपली शहरे आर्थिक विकास, नवोन्मेष आणि रोजगाराची केंद्रे आहेत. मात्र, त्याचवेळी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, शुद्ध पाणी, परवडणारी घरे, वाहतूक कोंडी, प्रदूषण, हवामान बदल, सार्वजनिक आरोग्य आणि शाश्वत पायाभूत सुविधा अशा अनेक गुंतागुंतीच्या आव्हानांना शहरांना सामोरे जावे लागत आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी मुंबईची लोकसंख्या सुमारे अडीच लाख होती, तर आज मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या दोन कोटीच्या आसपास आहे. लोकसंख्येतील या प्रचंड वाढीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आली आहे, असे मत राज्यपाल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केली.

शहरी भागातील घनकचरा व्यवस्थापनाच्या वाढत्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त करताना घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानाशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी अल्पकालीन कौशल्यवृद्धी व पुनर्कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्याचे आवाहनही राज्यपालांनी संस्थेला केले. बदलत्या नागरी गरजांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचा उल्लेख करताना अशा परिषदेमुळे शहरांना आपले अनुभव जगासमोर मांडण्याची तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम पद्धती जाणून अंगिकारण्याची संधी मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले. संसदीय लोकशाहीमध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नमूद करताना संस्थेचे महासंचालक जयराज फाटक यांनी संस्थेतर्फे स्थानिक स्वराज्य संस्था, स्वच्छता निरीक्षक, समुदाय विकास, अग्निशमन अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि नगर नियोजन आदी विषयांतील अभ्यासक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. संस्थेने आतापर्यंत १७ लाख लोकांना प्रशिक्षण दिल्याचे नमूद केले.

संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी यावर्षी संस्थेच्या माध्यमातून तिसरी जागतिक महापौर परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

००००



Source link

- Advertisement -