‘स्वच्छ कार्यालय–निरोगी, सकारात्मक आणि कार्यक्षम वातावरण’ मोहिमेला प्रारंभ

- Advertisement -


छत्रपती संभाजीनगर, दि. १ (विमाका) : कार्यालयीन परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतेची भावना रुजविण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ कार्यालय–निरोगी, सकारात्मक आणि कार्यक्षम वातावरण’ या मोहिमेला आज प्रारंभ झाला. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात स्वतः स्वच्छता उपक्रमात सहभागी होत मोहिमेची सुरुवात केली.

‘स्वच्छ कार्यालय ही केवळ जबाबदारी नसून सकारात्मक आणि कार्यक्षम कार्यसंस्कृतीची सुरुवात आहे,’ असे सांगून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. कार्यालयीन परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमांतर्गत दर सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. सर्व अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचारीवर्गासह या उपक्रमात सहभागी होणार असून, कार्यालयीन परिसर, सभोवतालची जागा तसेच कामकाजाच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यावर भर देण्यात येणार आहे.

‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे कार्यालयीन परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रसन्न होण्यास मदत होणार आहे. स्वच्छ व सकारात्मक वातावरणामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यासोबतच विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही प्रसन्न वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.

ही मोहीम केवळ एकदाच न राबविता नियमितपणे दर सोमवारी एक तास श्रमदानातून राबविण्यात येणार आहे. याशिवाय कार्यालयीन स्वच्छता व परिसराचे सुशोभीकरण यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या कार्यस्थळाची स्वच्छता, नीटनेटकेपणा व परिसराची निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

*अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

मोहिमेच्या प्रारंभी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यालयीन परिसराची स्वच्छता केली.

यावेळी सह आयुक्त (अपील-२) खुशालसिंह परदेशी, सह आयुक्त (अपील-१) प्रताप काळे, सह आयुक्त (महसूल) रिता मैत्रेवार, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मंजुषा मिसकर, सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन) देविदास टेकाळे, उपायुक्त (पुरवठा) सुधाकर पवार, उपायुक्त (नियोजन) सुनील सूर्यवंशी, सहायक आयुक्त (मावक) सरिता सूत्रावे, सहायक आयुक्त (महसूल) शुभांगी आंधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) उद्धव होळकर, सहायक आयुक्त (विकास नियोजन) ज्ञानोबा मोकाटे, उपायुक्त (नगर परिषद प्रशासन) सविता हरकर, सहायक आयुक्त (नगर परिषद प्रशासन) सय्यद कंकर, तहसीलदार (सामान्य प्रशासन) किसन भदाणे, तहसीलदार (महसूल) सुनंदा पारवे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दर सोमवारी श्रमदानातून स्वच्छता आणि सातत्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून कार्यालयीन परिसर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सकारात्मक बनविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

******



Source link

- Advertisement -