कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरी सुविधांसाठी प्रस्ताव सादर करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

- Advertisement -


मुंबई, दि. ३ : कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी. आठवडी बाजार, स्मशानभूमी, भाजीपाला बाजार आणि उद्यान उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. कन्हान नगरपरिषदेतील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, आठवडी बाजार आणि स्मशानभूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास खासगी जमीन अधिग्रहित करण्याकरिता निधीची तरतूद करण्यात यावी. स्मशानभूमीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा. नगरोत्थान योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने अथवा कामांचे वर्गीकरण करून निधी वितरणाबाबत तपासणी करून नियमानुसार निधी उपलब्ध करून द्यावा.

बसस्थानकासाठी आरक्षित ठिकाणी बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा. मौजा कन्हान येथे ॲमेनिटी स्पेससाठी आरक्षित असलेल्या जागेवर उद्यान उभारण्यासंदर्भात तपासणी करावी. तसेच दुकान गाळे आणि व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. आरक्षित जागांवर अतिक्रमण असल्यास ते नियमानुसार हटविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिले.

0000

श्रीमती श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

 

 

 



Source link

- Advertisement -