महाराष्ट्र राज्य स्थापनादिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या जनतेला शुभेच्छा
मुंबई : संत आणि विचारवंतांची तसेच क्षात्र पराक्रमाची भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राने देशासाठी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. लोकहिताची जाण असलेल्या आणि बदलत्या परिस्थितीचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचेसह अनेक मान्यवरांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. हा समर्थ वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. कोरोना सारख्या संकटावर सर्वांनी एकत्र येत मात करायची आहे, महाराष्ट्राला यापुढेही सतत प्रगतीपथावर ठेवायचे आहे, अशी भावना विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी व्यक्त केली. १ मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन या निमित्त त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्र राज्य स्थापनादिनास ६० वर्षे पूर्ण झाल्याने हीरक महोत्सवी वाटचालीबद्दल समस्त महाराष्ट्रवासीयांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्यस्थापनेचा मंगल कलश ज्यांच्या शुभहस्ते ६० वर्षांपूर्वी मुंबईत आणण्यात आला, त्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतरावजी चव्हाण यांचे तसेच संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रदीर्घ लोकलढ्यातील सर्व आदरणीय नेत्यांचे, या लोकलढ्यात बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, असे विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. सर्वसामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावणारे, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला पोषक ठरणारे आणि पक्षीय मतमतांतरांच्या पलिकडे जाऊन व्यापक लोकहिताला अग्रक्रम देणारे निर्णय यापुढेही विधानमंडळाच्या माध्यमातून घेतले जातील, त्याअनुरुप कायद्यांची निर्मिती केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात सर्व यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. सर्वांनी स्वत:ची, कुटूंबीयांची आणि समाजाची उचित काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. विधानभवनात कोरोना संदर्भात नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला असून त्याव्दारे राज्यातील सर्व विधीमंडळ सदस्यांशी संपर्क साधून त्या-त्या मतदार संघातील परराज्यात व राज्यात अडकलेले रहिवासी आणि परराज्यातील महाराष्ट्रात अडकलेले रहिवासी यांची माहिती मागवून पोलीस महासंचालनालय आणि मदत व पुनर्वसन विभाग यांच्या समन्वयातून अशांचे स्थानांतरण करण्यासंदर्भात उचित कार्यवाही केली जात आहे, अशी माहितीही विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिली.