- कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण
सांगली, दि. २४ (जि. मा. का.) : कारागृहातील बंद्यांचे माणूस म्हणून पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांच्या मनपरिवर्तनासाठी नातेवाईकांशी संवाद महत्त्वाचा असून, मुलाखत कक्षाच्या माध्यमातून त्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. कारागृहात असे सुधारणात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासकीय निधी तसेच सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून तरतूद करू, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
सांगली जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी बांधलेल्या नवीन मुलाखत कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सांगली जिल्हा कारागृह येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, पालमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कारागृह अधीक्षक विजय कांबळे, कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त हणमंत नलवडे, नगरसेविका स्वाती शिंदे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अरूण मदने, तुरूंगाधिकारी माधुरी मोरे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माणसाच्या हातून अनावधानाने झालेल्या अपराधासाठी त्याला त्याच्या स्वजन व नातेवाईकांपासून दूर राहणे हीच मोठी शिक्षा असते. पश्चात्तापदग्ध कैद्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी तसेच त्यांच्या मनपरिवर्तनासाठी अनेक उपक्रम कारागृह प्रशासनाकडून राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष करण्यात आला आहे. नातेवाईकांशी संवाद साधून बंद्यांचे मनपरिवर्तन होऊ शकते. त्यांना चांगले जीवन जगण्याची उमेद मिळू शकते, असे ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मनपरिवर्तन होऊन चांगल्या वर्तणुकीमुळे किंवा अन्य कारणाने शिक्षेत सूट मिळालेल्या बंद्यांचे पुनर्वसन होऊन त्यांना माणूस म्हणून चांगले जीवन व्यतीत करता यावे म्हणून शासन अनेक सकारात्मक उपक्रम राबवत आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकासाचे धडे त्यांना देण्यात आले असून, कारागृहातील मूलभूत सोयी सुविधांसाठी आवश्यक निधी सदैव उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाला भेट देऊन पाहणी केली.
मुलाखत कक्षाचे उद्घाटन
सांगली जिल्हा कारागृह येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष बांधण्यात आला आहे. यामध्ये एका वेळी 10 कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येणार आहे. यासाठी 62 लाख रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
न्यायाधीन बंद्यांना आठवड्यातून एक दिवस व शिक्षाधीन बंद्यांना पंधरा दिवसातून एक वेळेस नातेवाईकांसोबत भेट देण्यात येते. या मुलाखत कक्षामुळे बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटण्यास सुसज्ज मुलाखत कक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आले आहेत. बंद्यांना व बंद्यांच्या नातेवाईकांना व त्यांच्या वकिलांना प्रत्यक्ष भेटीवेळी या मुलाखत कक्षातून संवाद साधता येणार आहे. बंद्यांची नातेवाईकांबरोबर समक्ष भेट झाल्याने त्यांचा ताणतणाव कमी होऊन, गुन्हेगारीपासून दूर जाण्यासाठी त्यांची मानसिकता तयार होण्यासाठी मदत होते.
प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वाटप
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सांगली यांच्यावतीने कारागृहातील एकूण 81 बंद्यांना संगणक डाटा एन्ट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण दिले गेले. ते सर्व या डाटा एन्ट्री परीक्षेत उत्तीर्ण झाले. यापैकी 66 बंदी जामीनवर मुक्त झाले आहेत. सध्या कारागृहात 15 बंदी बंदिस्त असून त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
बंदी कारागृहातून मुक्त झाल्यानंतर सदर सर्टीफिकेटचा व कोर्सचा त्यांना नवीन आयुष्य जगण्याकरिता उपयोग होईल व देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्यास प्रोत्साहन मिळेल.
00000









WhatsApp