शंभर फुटी तिरंगा, प्रा. शरद पाटील स्मृती उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

- Advertisement -


सांगली, दि. २४(जि. मा. का.) : कुपवाड येथे सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने १०० फुटी भारतीय तिरंगा ध्वज व दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कुपवाड येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सुर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या सुविद्य पत्नी रतन पाटील, महापालिका सभागृह नेते संदीप आवटी, विष्णू माने, माजी महापैार संगीता खोत, नाथाभाऊ शेवाळे, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, पद्‌माकर जगदाळे, स्मारक समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रा. शरद पाटील यांचा साधेपणा, सामान्य नागरिकांशी असलेली आपुलकी या गुणगौरवासह सामाजिक व राजकीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समाजाला सहज भेटणारा आणि सामान्य माणसांसाठी वेळ देणारा नेता म्हणून शरद पाटील यांची ओळख होती, असे त्यांनी सांगितले. तसेच शरद पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीतील प्रसंगांना उजाळा दिला.

कुपवाड शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, केवळ रस्ते व गटारे बांधणे म्हणजे विकास नव्हे. शहराचा सर्वंकष विकास साधण्यासाठी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कुपवाडकरांनी उपलब्ध संधीचा उपयोग करून शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शहराचा विकास करताना पायाभूत सुविधांसोबतच मानवी विकासालाही प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना रोजगाराच्या संधी, मुलींचे शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आदी बाबींचाही विकास आराखड्यात समावेश असावा, असे ते म्हणाले.

यावेळी खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सुर्यवंशी यांनी दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या आठवणींना उजाळा देतानाच कुपवाड परिसरात अधिकाधिक विकास कामे करण्याचे आश्वासीत केले. त्याचबरोबर नाथाभाऊ शेवाळे यांनीही माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याबाबत विवेचन केले.

प्रास्ताविकात उपमहापौर गजानन मगदूम यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने कुपवाड येथे दीड कोटी रूपये खर्चून 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वज व माजी आमदार शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्यात येत असल्याचे सांगितले. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून कुपवाड येथील विकास कामासाठी अधिकाधिक निधी मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी स्मृती उद्यानाचा आराखडा तसेच माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या जीवनावर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशीला अनावरण करण्यात आले. तसेच माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन सरोज बाबर यांनी केले. आभार महानगरपालिका सभागृह नेते संदीप आवटी यांनी मानले. कार्यक्रमास महानगरपालिका पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000



Source link

- Advertisement -