टिटंबा आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात मंत्री डॉ. अशोक उईके यांचा मोठा निर्णय

टिटंबा आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात मंत्री डॉ. अशोक उईके यांचा मोठा निर्णय
- Advertisement -


अमरावती, दि. २७ : टिटंबा, ता. धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीने धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.

शनिवारी टिटंबा आश्रम शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तातडीने धारणी येथे भेट देत उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच पालकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यानंतर मंत्री डॉ. उईके यांनी थेट टिटंबा आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. विद्यार्थी, पालक, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सविस्तर बैठक घेतली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत टिटंबा आश्रमशाळेसाठी सेंट्रल किचनमधून पुरविले जाणारे भोजन तात्काळ बंद करण्याचा निर्णयही मंत्री डॉ. उईके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी संपूर्ण व्यवस्थेचा पुनर्विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित संस्थेला कोणीही पाठीशी घालणार नाही. चौकशी अहवालानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करणे, दोषींवर गुन्हे दाखल करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. चर्चेनंतर मंत्री डॉ. उईके यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि लेखी आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थी, पालक व आदिवासी संघटनांनी सुरू असलेले आंदोलन मागे घेत मंत्री डॉ. उईके यांचे आभार मानले.

या संपूर्ण प्रकरणात मंत्री डॉ. उईके यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

00000



Source link

- Advertisement -