यवतमाळ, दि. २७ : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१,७३८ लाभार्थी शेतक-यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक / सहकार अधिकारी श्रेणी-१ तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, शेतक-यांना पाहण्यासाठी उपलब्ध असुन योजनेस सर्व पात्र शेतक-यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे. कर्जमुक्ती योजनेस पात्र असणा-या ज्या शेतक-यांची अॅग्रीस्टॅक पोर्टलवर अद्यापही नोंदणी झालेली नाही, अशा शेतक-यांनी कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणिकरण सुलभतेने होण्यासाठी प्रथम अॅग्रीस्टँक पोर्टलवर तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. व त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चे आधार प्रमाणिकरण करावे.
यादीमध्ये नाव आलेल्या सर्व पात्र शेतक-यांनी सेतु सुविधा केंद्रावर आधार प्रमाणिकरण करण्यापुर्वी आपले नाव, बँक कर्ज खाते क्रमांक, कर्ज रक्कम याबाबत शहानिशा करुन आधार प्रमाणिकरण करावे व सुलभरित्या कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हयातील सर्व शेतक-यांना केले आहे.
विशिष्ठ क्रमांकाचे यादीत नाव आलेल्या शेतक-यांना त्यांचे कर्ज खात्याबाबत तक्रार असल्यास त्यांना योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी दिली.
000






















WhatsApp