बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करण्यावर भर – खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ३० : राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करणे, त्यांच्या समस्या सोडविणे आणि कारागिरांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.

    महाराष्ट्र राज्य सहकारी प्रशिक्षण संस्था, पुणे येथे महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभापती रवींद्र साठे म्हणाले, की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यात बलुतेदार सहकारी संस्था या मंडळाचा कणा असून, त्या मंडळाचा अविभाज्य भाग आहेत. संस्थांनी आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे काम करावे.

    माजी विधान परिषद सभापती वि. स. पागे यांच्या पुढाकारातून कारागीर रोजगार हमी योजनेची संकल्पना पुढे आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यात १९७२ पासून तालुका आणि ग्रामीण स्तरावर बलुतेदार सहकारी संस्थांच्या माध्यमातून कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या संस्थांचे कार्य अधिक सक्षम करण्यासाठी मंडळाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील सर्व बलुतेदार सहकारी संस्थांची परिपूर्ण माहिती मंडळाकडे सादर करावी. तसेच संस्थांची सद्यःस्थिती, अडचणी आणि आवश्यक सहकार्य याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आवाहन सभापती रवींद्र साठे यांनी केले.

    विशेष घटक व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनांचा लाभ देणार – मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत

    बलुतेदार सहकारी संस्था तळागाळातील गरजू, वंचित आणि मागास कारागिरांसाठी महत्वाचे काम करतात. या संस्थांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी सांगितले.

    कारागिरांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी वाढविण्याकरिता मंडळाच्या विशेष घटक योजना आणि मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेच्या माध्यमातून संस्थांना पुन्हा सक्षम करण्यावर भर देण्यात येईल. तसेच संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी मंडळातील उद्योग पर्यवेक्षकांना सहकार्य करण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, त्यांच्या कामकाजातील अडथळे आणि संस्थांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

    बैठकीस मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, हातकागद विभागाचे अमर राऊत तसेच महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या बलुतेदार सहकारी संघांच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

    महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्री. कुंभार यांनी केले, तर अंकुश आंबेकर यांनी आभार मानले.

    ०००

    गजानन पाटील/विसंअ

     

     

    - Advertisement -