राज्यातील पहिले ग्रीन डेटा सेंटर उजनी जलाशयावर – महासंवाद

    - Advertisement -

    • शेतकरी हिताचा पर्यावरण पूरक प्रकल्प

    मुंबई,  दि. ३० : महाराष्ट्रात स्वच्छ ऊर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणावरील रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत असून, याच व्यापक विकास दृष्टीतून उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित भव्य डेटा सेंटर, तरंगती सौर ऊर्जा, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स प्रकल्प कार्यान्वित होत आहे. महाराष्ट्रातील पहिला ग्रीन डेटा सेंटर प्रकल्प पर्यावरणाचे रक्षण करणारा रोजगार निर्मितीला चालना देणारा आणि सिंचनाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

    २,००० मेगावॅट स्वच्छ ऊर्जा आणि आधुनिक ‘एआय डेटा सेंटर‘

    या प्रस्‍तावित प्रकल्पातून उजनी येथे सुमारे २,००० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार असून, सौर ऊर्जेच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी १,८०० मेगावॅट क्षमतेची ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम’ उभारली जाईल, ज्यामुळे ग्रीड स्थिरतेस मदत होईल. टप्प्याटप्प्याने १,४०० मेगावॅट क्षमतेचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर’ विकसित करण्‍याचे उदिष्ट आहे.

    पिण्याचे पाणी व सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य; बाष्पीभवनात १.५ टीएमसीची होणार बचत

    “उजनी जलाशयाचे पूर्ण संचय पातळीस (एफआरएल) ३३हजार ३६० इतकी आहे.यापैकी ३हजार हेक्टर क्षेत्र म्हणजे अवघे ९टक्के क्षेत्र फ्लोटींग सोलर प्रकल्पाकरीता प्रस्तावित आहे.जलाशयाचे उर्वरित ९१टक्के क्षेत्र पूर्णता खुलेच राहाणार आहे. विद्यमान पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सिंचनाच्या गरजांना या प्रकल्पामुळे कोणतीही बाधा येणार नाही. प्रकल्पासाठीचा पाणीवापर जलसंपदा विभागाच्या मंजुरी व निर्धारित अटींनुसारच केला जाणार आहे.

    या प्रकल्पाची महत्तम नियोजित वार्षिक पाणी मागणी ०.४२ टीएमसी इतकी अत्यंत मर्यादित आहे. उजनी जलाशयाचे वार्षिक बाष्पीभवन सुमारे १५.९ टीएमसी असल्याचा अंदाज आहे. प्रस्तावित तरंगत्या सौर प्रकल्पासाठी जलाशयाच्या सुमारे ३,००० हेक्टर पृष्ठभागाचा मर्यादित भाग वापरण्यात येणार असल्याने सौर पॅनेल्सच्या सावलीमुळे बाष्पीभवनात उलट सुमारे १.५ टीएमसी इतकी वार्षिक पाण्याची बचत होईल.उजनी धरण परिसरात कोणत्याही प्रकारचा न्यूक्लिअर प्रकल्प होणार नाही.त्यामुळे याबाबत निर्माण केली जाणारी चर्चा निरर्थक असून,धरण परिसरात हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित होणार नाही.

    माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेटा सेंटर हा सर्वात महत्वाचा घटक झाला असून,अन्य देशांवर अवलंबून न राहाता आपल्याच देशात यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाच्या उभारणी मागे आहे.

    जमीन संपादनाबाबत

    माढा तालुक्यातील भीमनगर येथील जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागेत राहात असलेल्या ३११कुंटुबाकरीता ५१.१८एकर क्षेत्र कोणताही मोबदला न घेता दिलेले आहे.गेल्या ४०वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून स्थानिकांना हक्काची जागा देण्यात आली आहे.या ५१.१८एकर क्षेत्राबाहेर एकही खासगी घर नसल्याने कोणतेही कुटुंब विस्थापीत होत नाही.संपादित क्षेत्रापैकी १२एकर क्षेत्रावर सहा स्थानिक शेतकरी शेती करीत आहेत त्यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

    शेतकऱ्यांचा पाण्याचा हक्क अबाधित

    प्रकल्पामुळे ५लाख शेतकरी बाधीत होणार ही निर्माण करण्यात आलेली भीती निरर्थक असून,प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरही शेतकऱ्यासाठी सुरू असलेल्या पाणी वितरणामध्ये कोणतीही कपात होणार नाही.सदर प्रकल्पाकरीता अधिकतम ०.५टीएमसी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पाणी टंचाई होण्याचा कोणताही प्रश्न नाही. डेटा सेंटर व बॅटरीत कोणतीही उत्पादन प्रक्रिया नसल्याने रसायानाचे पाणी निर्माण होवून धरणात सोडण्याचा प्रश्न नाही.

    स्थानिक मच्छीमार बांधवांच्या हिताचे पूर्ण संरक्षण

    प्रकल्प उभारताना उजनी जलाशयावर अवलंबून असलेल्या स्थानिक मच्छीमार बांधवांच्या हिताचे संरक्षण करण्यास प्राधान्य देण्यात आले असून, सद्यस्थितीत मत्स्यविकासासाठी काढण्यात आलेली निविदा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रस्तावित तरंगता सौर प्रकल्प जलाशयाच्या संपूर्ण पृष्ठभागावर कार्यान्वित होणार नसून, माशांचा अधिवास किंवा प्रजननासाठी आवश्यक वातावरण कायम राहाण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे.हा प्रकल्प पूर्णपणे स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सौर ऊर्जेवर आधारित आहे.”

    रोजगार आणि स्थानिक व्यवसायांना संधी

    प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक युवकांना कायमस्वरूपी, तर बांधकाम व पुरवठा साखळीच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच नोकरीची तसेच इंटर्नशिपची संधी उपलब्ध होईल.

    सिंचन सुविधांना बळकटी

    प्रकल्पद्वारे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास प्रतिवर्षी १८०कोटी रूपये इतके उत्पन्न उपलब्ध होणार आहे.सदर निधी उजनी धरणाच्या प्रकल्पाची तसेच सिंचन सुविधांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाईल.पर्यायाने याचा फायदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.

    सोलापूर जिल्हा येणार केंद्रस्थानी

    सोलार प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक सोलापूर जिल्ह्यात येत आहे.औद्यगिक विकासाच्या दृष्टीने सोलापूरचे महत्व अधोरेखीत झाले असून,कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नवीन तंत्रज्ञानात विकसित होणारे महाराष्ट्रातील पहीले ग्रीन डेटा सेंटर सोलापूरच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल.

    0000

    किरण वाघ/विसंअ

     

     

    - Advertisement -