
पुणे, दि. ३० : स्वच्छ आणि हरित वाहतूक व्यवस्था ही विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्राची प्रमुख प्राथमिकता आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे बनत आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समुहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, बी. एल. संतोष, ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता आणि सुनंदा मेहता यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून प्रदूषण आणि जीवाश्म इंधनावरील आयात कमी करण्यास मदत होणार आहे. ऑटोमोबाईल उद्योग हा रोजगारनिर्मिती आणि पूरक उद्योगांच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. तीन वर्षांत महाराष्ट्राला ५० हजार इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असून, राज्यातील उद्योगांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विस्तारासाठी हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यावर राज्याचा भर असून, आगामी काळात वीज निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचा वाटा वाढविण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सक्षम चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने सर्वंकष आराखडा तयार केला आहे. वाहन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने राज्यातील प्रमुख महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक जागा, परवानग्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पिनॅकल समूहाच्या एका उत्पादन सुविधेत ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा भागधारक असण्याचे मॉडेलही कौतुकास्पद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. पिनॅकल समूहाच्या नव्या उत्पादन सुविधांमुळे महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी राज्यातच पूर्ण होण्यास मदत होईल आणि महाराष्ट्र ईव्ही निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारताने जागतिक नेतृत्व करावे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असून, ऑटोमोबाईल उद्योग हा भारतीय औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे. देशातील वाहन उद्योगाचा विस्तार, रोजगारनिर्मिती आणि निर्यातीत मोठे योगदान आहे. त्यामुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. इलेक्ट्रिक वाहने, ट्रक आणि बस निर्मितीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
भारताची जीवाश्म इंधनावरील आयात कमी करून स्वदेशी पर्यायी इंधन, जैवइंधन, इथेनॉल आणि हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देणे ही केंद्र सरकारची भूमिका आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत उत्पादन क्षमता वाढविण्याची गरज असून, विशेषतः इलेक्ट्रिक बस आणि ट्रक निर्मितीत मोठी संधी आहे. वाहन उद्योगाने बॅटरी, संशोधन, नवकल्पना आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासावर भर द्यावा. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता आणि इंधनदाताही व्हावे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा अधिक किफायतशीर करण्याबरोबरच लॉजिस्टिक खर्च, प्रदूषण आणि इंधन आयात कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. भारताने शंभर टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.
गडकरी पुढे म्हणाले की, वाहन उद्योगातील बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना स्टार्टअप, तरुण अभियंते, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांना उद्योगाशी जोडणे महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिक ट्रकच्या निर्मितीत बॅटरीचे वजन लक्षात घेऊन वाहनांची मालवाहतूक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीनेही तंत्रज्ञान विकसित करता येईल. तसेच महामार्गांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधांचा विस्तार आणि वीजदर कमी करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. आगामी काळात शंभर टक्के जैवइथेनॉलवर चालणारी वाहने तसेच हायड्रोजनवर आधारित ट्रक बाजारात येतील. पर्यायी इंधन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर भारताला आत्मनिर्भर बनविण्यासह देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वदेशी उत्पादन, इलेक्ट्रिक वाहने आणि आधुनिक तंत्रज्ञानातील गुंतवणुकीवर भर – केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक उत्पादन क्षेत्रातील प्रमुख शक्ती म्हणून वेगाने पुढे जात आहे. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ या संकल्पनांच्या माध्यमातून स्वदेशी उत्पादन, तांत्रिक नवकल्पना आणि शाश्वत मोबिलिटीला भक्कम आधार मिळत आहे. इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहने, वाहनांचे सुटे भाग आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढणे हे भारतीय उद्योगविश्वाच्या वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले.
ऑटोमोबाईल आणि वाहन सुटे भाग उद्योग हा देशाच्या औद्योगिक विकासाचा महत्त्वाचा आधार असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून देशांतर्गत उत्पादन, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, बॅटरी निर्मिती आणि चार्जिंग सुविधांना प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय उद्योगांनी इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, वाहन सॉफ्टवेअर, हलके साहित्य आणि हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी. केवळ जागतिक मोबिलिटी क्षेत्रातील बदलांचा भाग न राहता भारताने या क्षेत्राचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी पसंतीचे केंद्र- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
भक्कम औद्योगिक पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांना प्रोत्साहन देणारे सरकार यामुळे पुणे आणि महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी पसंतीचे केंद्र ठरत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. ‘व्हीडीएल ग्रुप’ आणि ‘पिनॅकल इंडस्ट्रीज’ यांचा संयुक्त उपक्रम पुण्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वर्गीय अजितदादांचा उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासावर ठाम विश्वास होता हे सांगून या कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेस लवकरच पुणे आणि मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसतील. यामुळे पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘ईका’ समूहाने उत्पादन, संशोधन, विकास आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांत महिलांना समान रोजगाराच्या संधी दिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. राज्यातील प्रत्येक कंपनीने महिलांना अशा संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन केले. पुण्यातील पाच उत्पादन प्रकल्पांमधून हजारो रोजगार निर्माण होत असून, तरुणांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या.
कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी प्रास्ताविकात उद्योग समूहाच्या आजवरच्या वाटचालीचा, औद्योगिक क्षेत्रातील योगदानाचा तसेच भविष्यातील विस्तार योजना बाबत सविस्तर माहिती दिली.
उद्योग समूहाला केंद्र व राज्य शासनाकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी, उद्योजक तसेच नागरिक उपस्थित होते.
00000

WhatsApp