भाविकांची सुरक्षितता, सुलभ वाहतूक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्याला प्राधान्य द्या – पालकमंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    - Advertisement -

    नाशिक, दि. १६ ऑक्टोबर: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने सूक्ष्म व परिपूर्ण नियोजन करावे. अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपाययोजना करताना भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हा सोहळा भव्य-दिव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय होण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिंहस्थ महाकुंभमेळा, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण समारंभाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

    बैठकीस महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार गोकुळ गीते, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, जलसंपदा विभागाचे राजेश गोवर्धने, उपमहापौर विलास शिंदे, सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे समन्वयक रामेश्वर नाईक, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, मनोज थेटे, भक्तीचरणदास महाराज, रामतीर्थ गोदावरी समितीचे जयवंत गायधनी आदी उपस्थित होते.

    नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष नियोजन

    पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणारे भाविक, नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. वाहनतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुकर असावेत. भाविकांना कमीत कमी अंतर पायी चालावे लागेल, अशा पद्धतीने वाहनतळ, वाहतूक व्यवस्था आणि होल्डिंग एरियाचे नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन, अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्थाही प्रभावी असावी. कार्यक्रमाच्या नियोजनामुळे स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

    ध्वजारोहण सोहळ्याशी संबंधित सर्व कार्यक्रमांची आखणी वेळेत पूर्ण करावी. ग्राम प्रदक्षिणा, ध्वजारोहण समारंभ, सायंकाळची आरती, शंखनाद आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने करावे. साधू, संत, महंत, सर्व आखाडे प्रमुख आणि सर्व संबंधित मान्यवरांना निमंत्रणे पाठविण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. ‘हर घर भगवा ध्वज’ उपक्रमासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

    ग्रामपरिक्रमा, गोदावरी आरतीसह विविध उपक्रमांचे नियोजन

    कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीची तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. ग्रामपरिक्रमा, गोदावरी आरती, अति महत्वाच्या व मान्यवर व्यक्तींचे नियोजित दौरा आणि त्र्यंबकेश्वर येथे शंकराचार्यांचे दर्शन यासह विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती सादर केली.

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक प्रसिद्धीसाठी कुंभमेळा संकेतस्थळाचे अनावरण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, कुंभगीत आणि टपाल तिकीट यांसारख्या उपक्रमांचेही नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित उपाययोजनांबाबत माहिती सादर केली. तर श्रीमती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत समारंभाच्या तयारीची माहिती दिली.

    शंखनादाच्या विश्वविक्रमासाठी पूर्वतयारीचा आढावा

    बैठकीत शंखनादाच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याच्या प्रस्तावित उपक्रमाच्या पूर्वतयारीचाही आढावा घेण्यात आला. या उपक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक नियोजन आणि संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली.

    ३० ऑक्टोबर रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे शोभायात्रा आणि ग्रामपरिक्रमा आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

    महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि रामतीर्थ गोदावरी आरती समितीचे जयवंत गायधनी यांनी गंगा-गोदावरी आरती आणि नगरप्रदक्षिणेच्या नियोजनाबाबत सूचना मांडल्या. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सूचना केल्या.

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्धारित वेळेत पूर्वतयारी पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच या समारंभास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केले.

    0000

    - Advertisement -