‘शबरी नॅचरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ (जी-मार्क) जाहीर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडच्या पॅकेजिंग डिझाईनला जपानचा प्रतिष्ठेचा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ (जी-मार्क) जाहीर झाला आहे. यापूर्वी या ब्रँडला ‘इंडिया डिझाईन मार्क’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. या यशामुळे महाराष्ट्रातील आदिवासी कला, संस्कृती आणि नैसर्गिक उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.

    आदिवासी बांधवांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह त्यांची संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ‘शबरी नॅचरल्स’ हा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. या ब्रँडच्या पॅकेजिंगमध्ये वारली, गोंडी आणि चित्रकथी या पारंपरिक कलांचा तसेच आदिवासी जीवनशैलीचा व निसर्गाशी असलेल्या नात्याचा सर्जनशील समावेश करण्यात आला आहे. मध, मोहफुलांपासून तयार केलेली उत्पादने, चारोळी आणि बांबू उत्पादने यांना या ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.

    आदिवासी संस्कृती आणि कष्टाचा सन्मान – मंत्री डॉ. अशोक वुईके

    ‘शबरी नॅचरल्स’ला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजे आदिवासी संस्कृती आणि बांधवांच्या कष्टाचा सन्मान आहे. यामुळे उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत ओळख व विश्वासार्हता मिळून आदिवासी समुदायाच्या शाश्वत विकासाला आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केली.

    जागतिक ओळखीसोबत जबाबदारीही वाढली – आयुक्त लीना बनसोड

    ‘शबरी नॅचरल्स’च्या पॅकेजिंगला जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारामुळे ब्रँडला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली असून, या यशाचे खरे मानकरी आदिवासी बांधव आहेत. त्यांच्या कला, परंपरा आणि कार्यातूनच या उपक्रमाला प्रेरणा मिळत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले.

    ००००

    अश्विनी पुजारी/विसंअ

    - Advertisement -