
सेवा संकल्प अभियानांतर्गत धुळ्यात महिला शेतकरी मेळावा व प्रदर्शन; महिला शेतकऱ्यांच्या कष्टांचा, जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा गौरव
धुळे, दि. १५ ऑक्टोबर : सकाळी घरातील कामे आटोपून शेताची वाट धरणारी, उन्हातान्हात पेरणीपासून निंदणी, कोळपणीपर्यंत राबणारी आणि पुन्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी महिला ही खऱ्या अर्थाने शेतीचा कणा आहे. कुटुंबावर संकट आले, आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, तरी हिंमत न हारता कुटुंबाला सावरण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये असते. त्यांच्या कष्टांचा केवळ गौरव न करता त्यांना समान संधी, आर्थिक स्वावलंबन आणि योग्य सन्मान मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत कृषी विभाग, आत्मा, धुळे आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिरे भवन येथे आयोजित महिला शेतकरी मेळावा व प्रदर्शनाला पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी आमदार मंजूळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. जयेश बलकटे, जि.प.चे महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व महिला शेतकरी उपस्थित होत्या.
संकटातही कुटुंबाला सावरण्याची ताकद महिलांमध्ये!
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेती करणाऱ्या महिलेच्या कष्टाला वेळेचे बंधन नसते. घर, मुले, शेती आणि कुटुंबाची जबाबदारी ती समर्थपणे सांभाळते. संकटात कुटुंबातील इतर सदस्य हतबल झाले, तरी महिला खंबीरपणे उभी राहते. मुलांचे शिक्षण, संगोपन, शेती आणि रोजगारासाठी ती स्वतःच्या कष्टांची पर्वा करत नाही. संकटातून पुन्हा उभे राहण्याचे सामर्थ्य मातृशक्तीमध्ये आहे.
खानदेशातील महिलांचे शेतीतील योगदान मोठे आहे. त्यांची भूमिका केवळ शेतावर जेवणाचा डबा पोहोचविण्यापुरती मर्यादित नसून पेरणी, निंदणी, कोळपणीपासून शेतीच्या प्रत्येक कामात त्या सहभागी असतात. शेती टिकविण्यात आणि पुढील पिढीचे भविष्य घडविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
मातृशक्तीचा सन्मान तिच्या प्रगतीतून दिसला पाहिजे!
भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला हजारो वर्षांपासून आदराचे स्थान आहे. नवरात्रोत्सवात आपण देवीच्या विविध रूपांची आराधना करतो. मात्र, हा सन्मान महिलांच्या दैनंदिन जीवनात, अधिकारांमध्ये आणि प्रगतीच्या संधींमध्येही दिसला पाहिजे. योग्य संधी मिळाल्यास महिला कुटुंबाबरोबरच संपूर्ण गावाच्या विकासालाही चालना देऊ शकतात, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
विकसित भारतात महिलांचा वाटा बरोबरीचा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानातून विकसित भारताचा संकल्प करण्यात आला आहे. सन 2047 पर्यंत विकसित भारत घडविताना महिलांना समान जबाबदारी, अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजेत. देशाच्या प्रगतीत माता-भगिनी आणि मुलींना समान भागीदार करूनच पुढे जायचे आहे, असे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
लखपती दीदी योजना, महिला शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आधुनिक शेती, पूरक व्यवसाय व रोजगाराच्या संधी स्वीकाराव्यात. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंबाचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अडचण कोणतीही असो, तुमचा जयकुमार भाऊ सदैव तत्पर!
महिला शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहे. कोणतीही अडचण किंवा मदतीची गरज भासल्यास महिलांनी हक्काने सांगावे. “तुमचा जयकुमार भाऊ तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. तुमची कामे मार्गी लावण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन,” अशा शब्दांत त्यांनी विश्वास दिला.
शेतीच्या बांधापासून स्वावलंबनाच्या नव्या वाटांपर्यंत…
या मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञान, महिला शेतकरी सक्षमीकरण, महिला व बालकांचे पोषण व आरोग्य, शेतमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय, बचत गट आणि विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी प्रदर्शनातूनही महिलांना उपयुक्त माहिती देण्यात आली.
मेळाव्याच्या आयोजनाबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि आयोजकांचे अभिनंदन केले. महिला शेतकऱ्यांच्या कष्टांना यश मिळावे, त्यांच्या प्रगतीला बळ मिळावे आणि प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
महिलांनी स्वावलंबनासाठी पुढे यावे :आमदार मंजूळा गावित
यावेळी आमदार मंजूळा गावित म्हणाल्या की, महिला बचत गटांनी प्रामाणिक कर्जफेडीतून शासन व बँकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे नव्या उद्योगांसाठी 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. शेतात काम करणाऱ्या महिलांनी ‘शेतकरी महिला प्रमाणपत्र’ मिळवावे. सातबाऱ्याची अट शिथिल झाल्याने या प्रमाणपत्राच्या आधारे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. लखपती दीदी व ड्रोन दीदी योजनांतून शेवगा पावडर निर्मिती, बेकरी, शिलाई व शेतीपूरक व्यवसाय सुरू करावेत. नाशिक जिल्ह्यातील एका महिला सरपंचाने गावाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवून दिल्याचे उदाहरण देत महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
केवळ सत्कार नको, महिलांच्या आयुष्यात प्रत्यक्ष परिवर्तन घडले पाहिजे – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, शेतीमध्ये महिलांचे योगदान मोठे असूनही त्यांच्या कष्टांची पुरेशी दखल घेतली जात नाही. महिलांचा सन्मान केवळ सत्कार व प्रमाणपत्रांपुरता मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल झाला पाहिजे. महिलांनी आपल्या गरजा, अडचणी आणि व्यवसायाच्या अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात. कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभाग सहकार्यास तयार आहेत. महिलांनी बैठका आयोजित कराव्यात, अधिकाऱ्यांना शेतावर बोलवावे. गरज पडल्यास सायंकाळीही संवाद साधण्याची तयारी आहे. छोट्या प्रयत्नांतून पुढील पाच-दहा वर्षांत मोठा बदल घडेल. विकसित भारत 2047 साठी आजपासूनच पुढाकार घ्यावा.
महिलांनी आयुष्मान भारत कार्ड, ॲग्रीस्टॅक अर्थात फार्मर आयडी आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आयुष्मान कार्डसाठी विशेष शिबिरे आयोजित केली आहेत. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी दिवाळीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विक्री मेळावा घेण्याचा मानस आहे. महिलांशी मोकळ्या संवादासाठी ‘डबा पार्टी’सारखा उपक्रम घेऊन शेती, योजना, पशुसंवर्धन व मत्स्यपालनाच्या संधींवर चर्चा करता येईल. उपलब्ध जलसाठ्यांचा उपयोग करून महिलांनी मत्स्यव्यवसायातही पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.
शेतीसोबत कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांच्या योगदानाला सन्मान मिळाला पाहिजे. विशेषतः शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीच्या संघर्षाकडे लक्ष देऊन तिला आधार देणे आवश्यक आहे. महिलांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी कृषी विभागाने 10 ते 50 महिलांच्या गटांचा अभिप्राय प्रशासनापर्यंत पोहोचवावा. आवश्यक सुविधा व क्षेत्रभेटींबाबत महिलांनी सूचना कराव्यात, असे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले.
“तुम्ही महिला हीच माझी खरी शक्ती आहात. तुमच्यामुळे आम्ही आहोत; आमच्यामुळे तुम्ही नाही. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याची माझी तयारी आहे,” अशा आत्मीय शब्दांत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी विश्वास दिला आणि सर्व मातांना व महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
शेतातील मातीत घाम गाळणाऱ्या महिलांच्या हातात केवळ शेतीचेच नव्हे, तर कुटुंबाच्या स्वप्नांचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचेही भवितव्य आहे. त्या हातांना संधी, सन्मान आणि आर्थिक सामर्थ्य देण्याचा संदेश या मेळाव्यातून अधोरेखित झाला.
००००

WhatsApp