
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०२६ ची मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि सांघिक भावनेने काम करावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज वंदे मातरम् सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विजय गौंडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात असून, विभागात एकूण ८४२ मतदान केंद्रे आहेत. मतमोजणीसाठी सुमारे ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणारे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी सक्षम असून, सर्वांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. मतमोजणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील समन्वय आणि सांघिक कार्यपद्धती महत्त्वाची असून, सर्वांच्या सहकार्याने मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षणात मतमोजणी प्रक्रियेचे विविध टप्पे, कामानुसार जबाबदाऱ्यांची विभागणी, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये, वैध व अवैध मतपत्रिकांबाबतच्या तरतुदी, मतमोजणीदरम्यान करावयाच्या व टाळावयाच्या बाबी, तसेच निवडणूक आयोगाचे नियम व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध, अचूक व पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
०००००

WhatsApp