‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून तणावमुक्तीचा संदेश – महासंवाद

    - Advertisement -

    नाशिक, दि.२३ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : दैनंदिन जीवनातील बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या यामुळे अनेकांना ताण-तणावाचा सामना करावा लागतो. ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास त्याचा मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताणाची कारणे ओळखून त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. रिचा पनपालिया यांनी दिली.

    गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक व जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संदीप गुंडरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रिचा पनपालिया, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रवीण बावा, रुग्णालय अधिसेविका अनिता भालेराव, भगवान शिंदे, अख्यतर शेख, अनुज वेद, साहर वाघिले, मिलिंद पवार, उल्हास पैठणकर, प्रशांत बागुल यांच्यासह डॉक्टर, परिचारिका व नागरिक उपस्थित होते.

    डॉ. रिचा पनपालिया म्हणाल्या की, ताण-तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार, योग व ध्यानधारणा, कुटुंबीय व मित्रांशी संवाद यांना महत्त्व द्यावे. मनातील भावना व्यक्त करणे, दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करणे आणि स्वतःसाठी वेळ देणे यामुळे मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. तसेच ताण-तणावाची लक्षणे सातत्याने जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करून गरजेनुसार समुपदेशन व वैद्यकीय मदत घेण्यास नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.

    लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांच्या सहभागातून शासनाच्या विविध योजना, आरोग्यविषयक उपक्रम तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठाचा उपयोग जनजागृतीसाठी होत असल्याने नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंपादक श्री. बावा यांनी केले.

    ००००

    - Advertisement -