
मुंबई, दि. १४ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित सोसायटीधारकांनी भूमी अभिलेख विभागाकडे तातडीने रीतसर अर्ज दाखल करावेत. हे अर्ज प्राप्त होताच संबंधित जागेची मोजणी व सर्वेक्षणाचे काम विलंब न लावता हाती घ्यावे, असे निर्देश गृह (शहरे) व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.या प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील या जमिनीच्या हद्द निश्चितीबाबत तसेच संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
हद्द निश्चितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या सीमांकनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित सोसायटीधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागाने जागेची मोजणी आणि सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी दिले. या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सूचित केले.
स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करणार
हद्द निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन राबविण्यात येणार आहे. संबंधित नागरिकांचे सहकार्य घेऊन आवश्यक प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे यावेळी राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, महसूल विभागाच्या सहसचिव मनीषा जायभाये, पोलीस उपायुक्त (उत्तर विभाग-३) गजानन राजमाने, उपवनसंरक्षक किरण पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नागनाथ रोहिले नगरसेवक वैभव भरडकर, तसेच उज्वला भगत, आत्माराम चाचे, अरुण सुर्वे, सुरेश यादव, राजेश सावरकर, शरद वाघ, गोपाळ सुतार आणि संदीप मसूरकर यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
0000

WhatsApp