सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा – मंत्री दादाजी भुसे

- Advertisement -


नाशिक, दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामांना गती देत दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी  वरील सटाणा मंगरूळ रस्त्यावरील सटाणा शहरातील बांधकाम समस्यांबाबत आढावा बैठक मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला दृकदृष्य प्रणालीद्वारे मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार, मुंबई रस्ते व वाहतुक महामार्ग विभागाचे उप अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी प्रशांत हेगडे तर प्रत्यक्ष सटाणा  नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष हर्षदा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, प्रांताधिकारी महेश शेलार, मुख्याधिकारी ज्योती भगत, भूमिलेख उपअधिक्षक देवेंद्र भावसार यांच्यासह लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शहरातील सीमांकन, रिमॅपिंग, क्रॉस सेक्शन ड्रॉइंग तसेच आवश्यक नकाशे तयार करण्यासाठी नगरपालिकेने संबंधित यंत्रणांना सहकार्य करावे. प्रस्तावित कामांसाठी आवश्यक माहिती संकलित करून अल्पावधीत प्रस्ताव पूर्ण करावेत. पुढील पंधरा दिवसांत संबंधित प्रस्तावांबाबत आवश्यक कार्यवाही करून त्याचा नियमित पाठपुरावा करण्यात यावा. वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करावे.  शहरातील अतिक्रमण तातडीने काढण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. भूसंपादन व संबंधित प्रक्रिया गतीने पूर्ण करून उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी. रस्ते कामात येणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणी संबंधित विभागांनी तातडीने दूर करून कामाला गती द्यावी, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, उपलब्ध जागा, वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह विविध पायाभूत सुविधांच्या कामांचे प्रभावी नियोजन करून ती कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी,  शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर शाळा, बसथांबे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग व बायपासच्या कामांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. शाळांच्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रस्तावित बायपासच्या कामांचे अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करून संबंधित मंत्रालयाकडे पाठवावेत, असे निर्देश मंत्री श्री. भुसे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील उपलब्ध जागा व मालमत्तांचा योग्य वापर करून पायाभूत सुविधांचे नियोजन करावे. उपलब्ध जागेच्या आधारे आराखडा तयार करून त्यास आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा. भविष्यातील शहर विकासाचा विचार करताना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह विविध सेवा शक्यतो भूमिगत पद्धतीने नियोजित करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. शहराच्या पुनर्निर्माण व विकासाच्या कामांमध्ये भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असल्याचे  मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

दृकदृष्य प्रणालीद्वारे मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे सचिव श्री. शेलार व मुंबई रस्ते व वाहतुक महामार्ग विभागाचे उप अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी श्री. हेगडे यांनी प्राप्त प्रस्तावांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना  तातडीने  करण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री श्री. भुसे यांना सांगितले.

शहरातील अतिक्रमणधारकांना संबंधित विभागाने  नोटीस  देवून पुढील विहीत कार्यपध्दतीचा अवलंब संबंधित विभागाने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिल्या.

यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून रस्ते बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. शहरातील वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील अडचणी, जलनिस्सारण व्यवस्था, नागरिकांची गैरसोय तसेच कामातील तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मालेगाव शहरातील बायपासच्या प्रलंबित कामाबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

0000000



Source link

- Advertisement -