
सोलापूर, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मानाच्या आजोबा गणपतीच्या ठिकाणी ‘सांस्कृतिक महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला. नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री तथा ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, विधानपरिषद सदस्य राजाभाऊ राऊत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, पं. अजित कुमार कडकडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ट्रस्टचे उपाध्यक्ष काकासाहेब मेंडके, रिजनल मार्केटिंग हेड दीपक किंगर, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, नगरसेवक नागेश पाटील, शिवानंद पाटील, बबीता धुम्मा, गीता गवई यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य व गणेशभक्त उपस्थित होते.
यावेळी विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती उत्सवाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेविषयी माहिती दिली. आजोबा गणपतीच्या सार्वजनिक उत्सवाला दीर्घ परंपरा असून, सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनात या उत्सवाला विशेष स्थान आहे. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच कला, संगीत, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आजोबा गणपतीच्या उत्सवाला 1885 पासूनची परंपरा असल्याचे विविध ऐतिहासिक संदर्भांमध्ये नमूद केले जाते. काळानुरूप या उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आजोबा गणपती उत्सवाकडे पाहिले जाते.
सांस्कृतिक उपक्रमातून सामाजिक एकोपा बळकट होतो
दीपक किंगर म्हणाले की, गणेशोत्सव हा कला, संगीत, संस्कृती, परंपरा आणि लोकसहभागाला प्रोत्साहन देणारा उत्सव आहे. अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यास तसेच सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत होते.
तरुणांनी सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हावे
आमदार सुभाष देशमुख यांनी आजोबा गणपतीच्या पूजेचा मान दिल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. सोलापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी तरुणांनी विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महोत्सवाच्या निमित्ताने पं. अजित कुमार कडकडे यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या संगीत सादरीकरणाला उपस्थित रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि लोकांपर्यंत त्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा मिळाला. 0000

WhatsApp