होय, आम्हीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या..!

- Advertisement -

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकरने दिलीय. सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. एक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरने दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरेच्या साथीने गोळ्या झाडल्याची कबुली दिल्याचं सीबीआयने न्यायालयात म्हटलंय. आता यावर ५ जुलैला न्यायालय निर्णय देणार आहे. वीरेंद्र तावडे यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दाभोलकर यांची हत्या करायची आहे, असे आम्हाला सांगितले होते. आम्हाला पिस्तुलेही पुरविण्यात आली होती. दाभोलकर यांच्या डोक्यात गोळी मारण्याची सूचना आम्हाला देण्यात आली होती. त्यानुसार मी त्यांच्या डोक्यात गोळी घातली तर सचिन अंदुरेने त्यांच्या पोटावर गोळी झाडली. ते मृत झाल्याची खात्री झाल्यावर आम्ही दोघांनी मोटारसायकलवरून पळून गेलो. त्यानंतर मागील वर्षी आम्ही संजीव पुनाळेकर यांना भेटलो होतो. यावेळी त्यांच्या सूचनेनुसार आम्ही शस्त्रे नष्ट केली होती, असे शरद कळसकरने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचंही नाव घेतलंय. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात २५ मे रोजी वकील संजीव पुनाळेकरांनाही सीबीआयनं अटक केली होती.

- Advertisement -