‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ संकल्पनेतून मुंबईत ‘राष्ट्रीय पोषण माह’उपक्रम – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई दि ८ : देशभरात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पोषण माह २०२६ अंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून बालक, गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांच्या पोषण व आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अंगणवाडी केंद्राशी जोडले जावे, बालकांच्या आरोग्य व पोषणाकडे लक्ष द्यावे आणि कुपोषणमुक्त मुंबईसाठी योगदान द्यावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

    मुंबई शहर व उपनगरातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून पोषण रॅली, पालक बैठका, जनजागृती कार्यक्रम, पाककला स्पर्धा, पोषण प्रदर्शन, वाढ मापन, आरोग्य तपासणी, पोषण शपथ तसेच विविध प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कुपोषण निर्मूलनासोबतच पहिल्या १,००० दिवसांचे महत्त्व, पूरक आहार, स्तनपान, बाल संगोपन, स्वच्छता व आरोग्यदायी जीवनशैली याबाबत कुटुंबांमध्ये जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्यसेविका व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

    पहिल्या हजार दिवसांचे महत्व, पोषण व आहार बालकांची वाढ व विकास कार्यक्रम, माता व किशोरवयीन मुलींचे आरोग्य, समुदायाचा सहभाग या पाच प्रमुख कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये खालील पाच मुख्य विषयांवर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत. आहारातील विविधता आणि पुरेसे प्रथिने, पूरक पोषण आहार, समुदायाची मालकी व उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषण आणि बाल्यकालीन उद्दीपन, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना असे मुख्य पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

    आहारातील विविधता आणि पुरेसे प्रथिने या उपक्रमाअंतर्गत आहारातील धान्ये, भरडधान्ये, कडधान्ये, फळे, भाज्या, दूध आणि प्राणिजन्य-वनस्पतीजन्य प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन वाढवण्यासाठी ‘प्रथिनयुक्त ताट स्पर्धा’ व पोषण मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. पूरक पोषण आहार कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना ताजे, स्वच्छ आणि पौष्टिक गरम शिजवलेले अन्न मिळण्यासाठी साप्ताहिक मेनू बदलाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. तसेच पालक व स्वयं-सहाय्यता गटांच्या सहभागाने भोजनाची चव चाखण्याचे सत्र आयोजित केले जाईल.

    समुदायाची मालकी व उत्तरदायित्व या उपक्रमाअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘अंगणवाडी व्यवस्थापन समित्या’ (AMC) सक्रिय करून सेवा वितरणाची गुणवत्ता सुधारली जाईल. तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रात पूरक पोषण आहाराचा तक्ता  (‘SNP मेनू बोर्ड’) प्रदर्शित करून पारदर्शकता वाढवली जाईल.

    बाल विकासासाठी पोषण आणि बाल्यकालीन उद्दीपन या उपक्रमाअंतर्गत पहिल्या १,००० दिवसांतील मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सुधारित गृहभेट नियोजन प्रणाली प्रभावीपणे राबवली जाईल. याद्वारे बालक काय खाते आणि कसे शिकते यामधील संबंधांवर भर दिला जाईल. तसेच, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) अंतर्गत मातृत्व लाभ योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पात्र गर्भवती व स्तनदा महिलांची १०० टक्के संपृक्तता मोहीम राबवून थेट लाभ हस्तांतरणास (DBT) गती दिली जाईल. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील नागरिकांनी, मातांनी व पालकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अंगणवाड्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा आणि मोहिमेला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

    - Advertisement -