पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
- Advertisement -

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. १२ : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी परिसरातील वाढत्या वाहतूकीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. या परिसरातील वाहतूकीच्या व्यापक पायाभूत सुविधा विकासाचे नियोजन करण्यात आले असून, पुणे येथील रस्ते विकासाच्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीच्या सुविधा प्रकल्पाबाबत आमदार महेश लांडगे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी परिसरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी येथे राज्यातील महत्वाचा आयटी आणि औद्योगिक परिसर असून येथे एमआयडीसीसह मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि आयटी कंपन्या कार्यरत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार या परिसराच्या विकासाचे धोरणात्मक नियोजन करण्यात येत आहे. या नियोजनांतर्गत १८ मीटर आणि २४ मीटर रुंदीचे नवीन रस्ते प्रस्तावित करण्यात येत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिंग रोड, डीपी रस्ते, अंतर्गत रस्ते आणि प्रमुख प्रवेशद्वार मार्गांचे हाती घेण्यात आले आहे. तसेच स्वामीनारायण मंदिर ते भुमकर पूल व नवले पूल परिसरातील काम सुरू असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे जाणाऱ्या अतिरिक्त सेवा रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया आणि भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नरे ते लावण पुलाचा सुमारे ३,६६० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नाशिक फाटा ते केळ या मार्गावर आठ पदरी पुलालाही मंजुरी मिळाली आहे. तसेच रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देणार  आहे. मेट्रो प्रकल्पांबाबतही मोठी प्रगती झाली असून पीसीएमपी ते फुगेवाडी, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट तसेच वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गांवरील कामे सुरू आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नाशिक फाटा ते आरटीओ ते जुना मुंबई-पुणे रस्ता या भागात भोसरी गावठाण परिसरातील रस्त्यांचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून काही ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. भोसरी परिसरातील स्पायरल रस्त्यासाठीही सुमारे ६९ ते ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ट्रॅफिक सिग्नल प्रणाली आणि आधुनिक ट्रॅफिक नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यात येईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.

प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य विजय वड्डेट्टीवार, राजेश पवार, शंकर जगताप, हेमंत रासणे,ॲड राहूल कुल यांनी भाग घेतला.

००००

संध्या गरवारे, वि. स. अ.

 

 

- Advertisement -