कुणबी जात प्रमाणपत्र नोंदी शोधण्यासाठी संकेतस्थळाची मदत घ्या – विभागीय आयुक्त – महासंवाद

    - Advertisement -

    छत्रपती संभाजीनगर, दि. ८ :- कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक जुन्या अभिलेखांतील नोंदी आता जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर गावनिहाय उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना या नोंदी सहज शोधता व डाउनलोड करता येणार असून, उपलब्ध नोंदीच्या आधारे वंशावळ जोडून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

    न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या कुणबी नोंदी संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या पूर्वजांच्या जुन्या नोंदी शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘कुणबी मराठा दस्त नोंदी’ हा पर्याय उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in असा आहे. या संकेतस्थळावर ‘कुणबी मराठा दस्त नोंदी’ हा पर्याय निवडल्यानंतर तालुकानिहाय नोंदी पाहता येतात. उदाहरणार्थ, सोयगाव तालुक्यात उपलब्ध असलेल्या नोंदींमध्ये गावाचे नाव, अभिलेखाचा प्रकार, अभिलेखाचा उपप्रकार व संबंधित व्यक्तीचे नाव अशी माहिती दिली आहे. सोयगाव तालुक्यात ३१ नोंदी उपलब्ध  असून, त्यामध्ये ‘रामचंद्र संपत पाटील’ यांच्या ‘कुणबी’ नोंदीचा समावेश आहे.

    संबंधित व्यक्तीची नोंद उपलब्ध असल्यास नागरिकांना त्या नोंदीचा दस्तऐवज संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतो. संबंधित व्यक्तीशी आपले नाते सिद्ध होत असल्यास, त्या दस्तऐवजाची प्रत अर्जासोबत जोडता येते. त्यासाठी संबंधित व्यक्तीपासून अर्जदारापर्यंतची वंशावळ उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जोडणे आवश्यक आहे.

    कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना उपलब्ध नोंद व अर्जदाराचे संबंधित व्यक्तीशी असलेले नाते यांचा योग्य मेळ असणे आवश्यक आहे. केवळ नोंद उपलब्ध असल्याने प्रमाणपत्र आपोआप मिळत नाही. नियमानुसार आवश्यक कागदपत्रे व वंशावळीच्या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाते.

    राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर अशा नोंदी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या गावातील व पूर्वजांशी संबंधित नोंदी शोधाव्यात. या नोंदी नागरिकांपर्यंत सहज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व त्यांच्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. नागरिकांनी उपलब्ध नोंदींचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रे व वंशावळ जोडून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा.

    0000

    - Advertisement -