
नंदुरबार, दि.१० सप्टेंबर : सातपुडा पर्वत रांगेतील निसर्गरम्य तोरणमाळ या पर्यटनस्थळाचा विकास करताना निसर्गाचा समतोल राखण्याबरोबरच पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करावीत, अशा सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज दुपारी तोरणमाळ, ता. धडगाव येथे भेट देऊन तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, उपवनसंरक्षक श्री. सस्ते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तोरणमाळ येथील यशवंत तलाव परिसराचा विकास, मुलांसाठी विविध मनोरंजनाची साधने, नौकानयन आदी उपक्रमांचा समावेश करावा. सातपुडा पर्वतरांगांचा नैसर्गिक ठेवा जपत वाहनतळ, पदपथ, आवश्यक बांधकामे तसेच पर्यटकांसाठी निवास व भोजन व्यवस्था विकसित करावी. पर्यटकांना सुखकर आणि सुरक्षित सुविधा मिळतील, यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांचे योग्य नियोजन करावे. पर्यटन विकास करताना निसर्गाचा समतोल आणि परिसराचे पर्यावरण अबाधित राहील, याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी तोरणमाळ येथील सीताखाई, यशवंत तलाव यांसह विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी विकासकामांची माहिती घेतली. यावेळी महसूल, जिल्हा परिषद, नियोजन तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी तोरणमाळ पर्यटन विकासासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली. पर्यटकांना स्थानिक पातळीवर निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘होम स्टे’ मॉडेल तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
00000

WhatsApp