
नागपूर, दि ११: नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या मारबत महोत्सवाला यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेते अंकूश चौधरी, क्रिकेटर उमेश यादव यांनी उपस्थित राहून उपस्थित विशाल जनसमुदायाचा उत्साह वाढविला. काही देशांतील वाणिज्य राजदूतांनीही या महोत्सवाला हजेरी लावली लावून नागपूर शहराची ही खास परंपरा प्रत्यक्ष जाणून घेतली.
नागपूरची ही परंपरा विशेष असून मारबत महोत्सवाला १४५ वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. शहराचे वैशिष्ट्य असलेल्या मारबत-बडग्या मिरवणुकीच्या परंपरेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन यावर्षी प्रथम मारबत महोत्सवाचे आयोजन केले. मारबत आणि विविध विषयांवरील बडग्यांची मिरवणूक मान्यवरांना पाहता यावी, यासाठी सेंट्रल एव्हेन्यूवरील गांधी पुतळा चौकात भव्य मंच उभारण्यात आला होता.
याप्रसंगी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड आशीष जयस्वाल, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, डॉ. राजीव पोतदार तसेच महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रीक लेवेरीनो, नॉर्वेच्या वाणिज्यदूत मोनिका निगलगार्ड, फिनलँडच्या वाणिज्यदूत पेट्रा थीमन आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांच्या वतीने मिरवणुकीवर पुष्पवर्षाव करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या विदेशी पाहुण्यांनीही या परंपरेमागील माहिती व इतिहास जाणून घेतला. स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र बोरकर, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्यासह साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, ग्राफीक डिझायनर विवेक रानडे यांनीही या महोत्सवाला हजेरी लावली.

नागपूरच्या परंपरेला जागतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न स्तुत्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरच्या या परंपरेला जागतिक स्वरुप देण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे स्तुत्य आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे कौतूक केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या जीवनात असणाऱ्या सर्व समस्या दूर व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.
000

WhatsApp