सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७  ते २४  सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६  शास्त्रीय संगीत महोत्सव’; नामवंत कलाकारांचे सादरीकरण – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १३ : गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची विशेष मेजवानी अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘गणेशोत्सव २०२६  शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७  ते २४  सप्टेंबर २०२६  दरम्यान दररोज सायंकाळी ६.३०  वाजता मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.

    गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून, त्याला संगीत, कला, भक्ती आणि लोकपरंपरेची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या उत्सवाच्या माध्यमातून विविध कलाप्रकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित या शास्त्रीय संगीत महोत्सवातून आठ दिवस विविध नामवंत कलाकारांच्या गायन व वादनाची सुरेल मेजवानी रसिकांना मिळणार आहे. अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जतन व संवर्धन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

    महोत्सवाची सुरुवात गुरुवार, १७  सप्टेंबर रोजी सुभद्रा देसाई यांच्या गायनाने होणार असून, त्याच दिवशी एस. आकाश आणि मेहताब अली नियाझी यांचे बासरी व सतार युगल वादन सादर होणार आहे. शुक्रवार, १८  सप्टेंबर रोजी स्वर शर्मा आणि अनुजा झोकरकर यांचे गायन, शनिवार, १९  सप्टेंबर रोजी नूपुर गाडगीळ आणि नागेश आडगावकर यांचे गायन, तर रविवार, २०  सप्टेंबर रोजी मृणालिनी देसाई यांचे रुद्रवीणा वादन आणि गंधार देशपांडे यांचे गायन सादर होणार आहे.

    सोमवार, २१  सप्टेंबर रोजी प्राजक्ता मराठे यांचे गायन आणि यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन, मंगळवार, २२  सप्टेंबर रोजी धनंजय हेगडे यांचे गायन तसेच यशवंत वैष्णव आणि सुखद मुंडे यांचे तबला व पखावज युगल वादन, बुधवार, २३  सप्टेंबर रोजी विनय रामदासन यांचे गायन आणि अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन, तर महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी गुरुवार, २४  सप्टेंबर रोजी केदार केळकर यांचे गायन तसेच अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे युगल गायन सादर होणार आहे. विविध गायन व वादन प्रकारांतून शास्त्रीय संगीताची वैविध्यपूर्ण अनुभूती रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून घेता येणार आहे.

    महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील शास्त्रीय संगीताची अभिजात परंपरा जपणे, तिचे संवर्धन करणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि संगीतप्रेमी रसिकांना दर्जेदार शास्त्रीय संगीताचा अनुभव उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे.

    हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत शास्त्रीय संगीत, नाट्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या जतन, संवर्धन व प्रसारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

    ‘गणेशोत्सव २०२६  शास्त्रीय संगीत महोत्सवा’साठी प्रवेश निःशुल्क असून, मुंबईतील तसेच परिसरातील सर्व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आठवडाभर चालणाऱ्या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

    - Advertisement -