
मुंबई, दि. ७ : राज्यातील विविध विभाग, मंडळे, महामंडळे तसेच कार्यालयांकडून मोडी लिपीतील ऐतिहासिक व प्रशासकीय अभिलेखांचे मराठीमध्ये लिप्यंतर तसेच इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन भाषा संचालनालयाने मोडी तज्ज्ञ अनुवादकांची नामिका विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुक मोडी लिपी तज्ज्ञ व लिप्यंतरकारांकडून २५ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
विहित कार्यपद्धतीनुसार यापूर्वी भाषा संचालनालयामार्फत ३० मोडी लिप्यंतरकारांची निवड करण्यात आली असून, मराठी भाषा विभागाच्या २७ मे २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये ३० मोडी लिप्यंतरकारांची नामिका स्थापन करण्यात आली आहे. राज्यभरातून मोडी लिप्यंतरकारांची वाढती मागणी तसेच नामिकेत समावेश करण्यासाठी प्राप्त झालेली निवेदने व विनंती अर्ज विचारात घेऊन ही नामिका विस्तारित करण्यात येत आहे.
यापूर्वी २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, राज्याच्या विविध भागांतून मोडी लिप्यंतरकारांकडून प्राप्त झालेली मागणी आणि अधिकाधिक पात्र मोडी तज्ज्ञांचा नामिकेत समावेश करण्याच्या उद्देशाने अर्ज सादर करण्याची मुदत आता २५ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
उमेदवारांची शैक्षणिक अर्हता व अनुभव यासह अन्य अटी व शर्ती
- अनुवादकास प्रशासकीय, कायदेविषयक, वैद्यकीय, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी इत्यादी अभिलेखांच्या व कागदपत्रांच्या मोडी मजकुराचे मराठी लिप्यंतर आणि/किंवा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्याचा अनुभव असावा.
- मोडी तज्ज्ञ अनुवादकास मोडी लिपीचे आणि इंग्रजी व मराठी विषयांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
- ज्या व्यक्तींनी उपरोक्त एक किंवा अनेक विषयांमध्ये स्वतः मोडीतून मराठीत लिप्यंतर आणि/किंवा इंग्रजीत अनुवाद करून पुस्तके प्रकाशित केली आहेत अशा व्यक्ती देखील अर्ज करू शकतात.
- अनुवादकास पुरेसे संगणक ज्ञान आवश्यक आहे. अनुवादकांकडे इंटरनेटसह संगणकाची सुविधा असावी.
- मोडी लिपीतील ज्ञानासाठी तसेच इंग्रजी व मराठी भाषेतील ज्ञानासाठी शासन मान्यता प्राप्त संस्थेतील किंवा महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी/पदवी/अनुवाद पदविका अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम प्रमाणपत्र असलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.
- नामिकेवर घेतलेल्या मोडी तज्ज्ञ अनुवादकांना, शासनाच्या विविध विभाग, मंडळे, महामंडळे यांच्याकडून अनुवादांची कामे परस्पर पाठविण्यात येतील तसेच संबंधित विभाग व कार्यालय आणि मोडी तज्ज्ञ अनुवादक यांच्यामध्ये ठरविण्यात येईल अशा मुदतीत ही कामे विहित मुदतीत पूर्ण करून देणे ही नामिकेतील मोडी तज्ज्ञ अनुवादकांची जबाबदारी असेल.
- नामिकेतील मोडी तज्ज्ञ अनुवादकांनी अनुवादाचे काम समाधानकारक पूर्ण करून दिल्यावर, शासन वेळोवेळी निश्चित करील त्या दरानुसार काम देणाऱ्या विभागाकडून किंवा कार्यालयाकडून किंवा संस्थेकडून अशा अनुवादकांना मानधन प्रदान करण्यात येईल.
- मोडी तज्ज्ञ अनुवादकाने अनुवादित केलेल्या अनुवादाच्या अचूकतेची व अर्थपूर्णतेची जबाबदारी सर्वस्वी संबंधित अनुवादकाची राहील.
- मोडी अनुवादकांनी, त्यांच्या कामाचा सहामाही अहवाल अनुक्रमे, दरवर्षी १५ जुलै व १५ जानेवारीपर्यंत विहित नमुन्यात या कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक राहील.
- मोडी लिपीतील मजकुराच्या लिप्यंतराच्या व अनुवादाच्या कामातील अचूकता, कार्यक्षमता व कार्यतत्परता याचा आढावा घेऊन नामिकेतील मोडी तज्ज्ञ अनुवादकांना वगळण्याचा तसेच नवीन मोडी तज्ज्ञ अनुवादकांचा नामिकेत समावेश करण्याचा अधिकार या कार्यालयास राहील.
यापूर्वी अर्ज सादर न केलेल्या इच्छुक मोडी लिपी तज्ज्ञांनी किंवा लिप्यंतरकारांनी मोडी लिपीतील पात्रता व अनुभवासंबंधीच्या मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतींसह आपले अर्ज भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०००५१ या पत्त्यावर पाठवावेत. तसेच [email protected] या ई-मेलवर किंवा टपालाद्वारेही अर्ज सादर करता येतील.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर २०२६ असून, त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे भाषा संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
गजानन पाटील/विसंअ

WhatsApp