प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १६ : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा चेंबूर येथील फाइन आर्ट सोसायटी सभागृहात आयोजित करण्यात आला. गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी काढले.

    प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा सन्मान सोहळा चेंबूर येथील फाइन आर्ट सोसायटी सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

    सरदेशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘५००० वाली दीदी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

    ‘५००० वाली दीदी’च्या कार्याचे कौतुक

    या सन्मान सोहळ्यात ‘५००० वाली दीदी’ म्हणून परिचित असलेल्या अंगणवाडी सेविकेने केलेले काम विशेष लक्षवेधी ठरले. पात्र गर्भवती आणि स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात वेळेवर जमा व्हावे, यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घेतलेले परिश्रम, लाभार्थ्यांशी साधलेला संवाद आणि कामाप्रती असलेली तत्परता यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

    यावेळी सरदेशमुख यांनी पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका या महिला व बालकल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महत्वाच्या घटक असून, त्यांच्या मेहनतीमुळे शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो, असे त्यांनी नमूद केले. यापुढेही योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

    या कार्यक्रमाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या सहआयुक्त संगीता लोंढे, उपायुक्त अब्दुल चौधरी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना मुंबई उपनगर जिल्ह्याचे नोडल अधिकारी शरद कुऱ्हाडे आणि आयसीडीएस मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोडल अधिकारी प्रेमा घाटगे उपस्थित होते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

     

    - Advertisement -