वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उभादांडा येथे भूमिपूजन संपन्न – महासंवाद

    - Advertisement -

    • जिल्ह्यात २२.२४ कोटी रुपयांच्या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची एका वर्षात होणार सुरुवात

    सिंधुदुर्ग, दि. १६ : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग उजळवणारा ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

    सध्या देशात मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश राज्य अव्वल स्थानी असून तिथे वार्षिक ५५ लाख ३९ हजार टन मत्स्य उत्पादन होते आणि केवळ मत्स्य व्यवसायामुळे त्या राज्याला ७७ हजार ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या तुलनेत महाराष्ट्र सध्या ७ लाख ४३ हजार टन उत्पादन घेत असून राज्याचे उत्पन्न १२,७७५ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छिमारांनाही जागतिक स्पर्धेत उतरवून ताकद देण्यासाठी राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला ‘कृषीचा दर्जा’ दिला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही सुलभपणे कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ देखील लागू करण्यात आली आहे.

    या कार्यक्रमात मत्स्योत्पादनासोबतच मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धन करण्यावरही मोठा भर देण्यात आला. मासे आणि कोळंबी सोलताना निघणाऱ्या कचऱ्यापासून कॉस्मेटिक्स उद्योगात वापरले जाणारे अत्यंत मूल्यवान ‘कोलाजेन’ तयार करण्याचे कारखाने उभे राहू शकतात. आंध्र प्रदेशातील एका प्रकल्पाचे उदाहरण देताना मंत्री महोदयांनी सांगितले की, ३० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या एका कारखान्याला अमेरिकन कंपनीकडून तब्बल साडेचारशे कोटींची ऑफर मिळाली होती. याच धर्तीवर आपल्याकडील मत्स्य कचऱ्याचा सदुपयोग करून स्थानिकांना याद्वारे मोठा आर्थिक नफा मिळवून दिला जाईल.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये आणि स्थानिक पातळीवरच त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्यात, यासाठी मत्स्य, पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १२ महिन्यांच्या आत म्हणजेच पुढील वर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री येतील. या प्रकल्पामुळे येथील मत्स्यव्यवसाय, महिला बचत गट आणि तरुण वर्गाला मोठा फायदा होईल आणि उभादांडासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, सरपंच नीलेश चमणकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त महेश देवरे, दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार, शास्त्रज्ञ पंकज पाटील, सहआयुक्त नागनाथ भादुले, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवसेकर आदी उपस्थित होते.

    अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आपल्या मनोगतात, पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प येत असून हा प्रकल्प जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणारा, लोकोपयोगी, रोजगार निर्मिती करणारा आणि आर्थिक सुबत्ता देणारा ठरेल, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, देशातील हे पहिलेच बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र आपल्या जिल्ह्यात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद करत शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या दर्जात आणि ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण केले जाईल, अशी खात्री आयुक्त भानुदास पालवे यांनी दिली. महेश देवरे यांनी, शास्त्रोक्त पद्धतीने जिताडा प्रकारातील १ कोटी मत्स्यबीज तयार करणारा हा प्रकल्प गरिबांना श्रीमंत करणारा ठरेल आणि बायो सिक्युरिटी पाळून स्थानिकांना मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला जाईल, असे सांगितले.

    तसेच शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी, पिंजरा व नैसर्गिक प्रक्रियेद्वारे मत्स्यबीज संवर्धन करून मत्स्य उत्पादक व बचत गटांची एक साखळी तयार केली जाईल आणि मत्स्य शेतीसाठी दर्जेदार बीज उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती दिली. विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी, कोकण पट्टीतील सर्वच मच्छिमारांना या प्रकल्पाचा फायदा व्हावा, यासाठी कांदळवन आणि मत्स्य विभाग पर्यावरण संवर्धनाचे रक्षण करत एकत्रितपणे काम करतील, असे सांगून शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला, प्रास्ताविकात कुवसेकर यांनी, सागरी मत्स्यव्यवसायाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा असलेल्या देशातील पहिल्या २२.२४ कोटी रुपयांच्या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची उभादंडा (वेंगुर्ला) येथे उभारणी केली जात असून यामुळे शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना मिळून युवकांना रोजगार मिळेल, अशी माहिती दिली.

    0000  

    - Advertisement -