
चंद्रपूर, दि. १५ : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील माता आणि बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मुंबई आयआयटीच्या अभिनव संकल्पनेतून विकसित करण्यात आलेला ‘माता, अर्भक व लहान बालक पोषण कार्यक्रम’ (Mother, Infant and Young Child Nutrition – MIYCN) आता चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण कमी करणे, त्यांची शारीरिक वाढ सुधारणे आणि माता-बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात माता व बालकांच्या पोषणविषयक सेवांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचा या महत्त्वाकांक्षी उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, आयआयटीशी संलग्न व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन आणि आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विकसित झालेली इडूयू पिरॅमिड एज्युकेशनल सर्व्हिसेस या संस्था धोरणात्मक व प्रमुख अंमलबजावणी भागीदार म्हणून कार्य करणार आहेत.
बालकांच्या पहिल्या दोन वर्षांतील पोषणावर विशेष भर : बालकाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात योग्य पोषण, नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर मार्गदर्शन मिळाल्यास कुपोषण व वाढ खुंटण्यासारख्या समस्या टाळता येऊ शकतात. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील मातांपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत आरोग्यविषयक माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक व आदिवासी भाषांमधील लघु शैक्षणिक चित्रफिती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि नियमित मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांची क्षमता वाढविण्यात येईल.
प्रत्येक बालकाच्या वाढीवर नियमित लक्ष : या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकेकडे माता आणि बालकांचा निश्चित गट राहणार आहे. गृहभेटीदरम्यान बालकांचे वजन, वाढ आणि पोषणस्थितीची नियमित नोंद घेतली जाईल. बालकाच्या वाढीचा वेग कमी होत असल्याचे लक्षात येताच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने वेळीच आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत.
यामुळे बालक कमी वजनाच्या किंवा कुपोषणाच्या स्थितीत जाण्यापूर्वीच संभाव्य धोका ओळखणे शक्य होईल. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून इतर कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल.
चंद्रपूर जिल्ह्यात माता-बाल आरोग्य सेवांना बळकटी : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात माता आणि बालकांपर्यंत पोषणविषयक माहिती प्रभावीपणे पोहोचविणे, बालकांच्या वाढीचे नियमित निरीक्षण करणे आणि कुपोषणाचा धोका वेळीच ओळखणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांच्या सहभागातून माता-बाल आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
विशेषतः मातांना स्तनपान, पूरक आहार, बालसंगोपन आणि योग्य पोषणाबाबत शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. बालकांना आयुष्याची निरोगी सुरुवात मिळावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक आरोग्य कर्मचारी आणि प्रभावी प्रशिक्षण यांची सांगड घालणारा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील माता-बाल आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
0000

WhatsApp