
मुंबई, दि. २ : विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी महाविद्यालयातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधांचा विस्तार, विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे बांधकाम तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार अनंत (बाळा) नर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सहसंचालक रुपेश राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण, क्रीडा संकुलाची उभारणी, महाविद्यालय परिसरात १५० फूट उंचीचा भव्य राष्ट्रध्वज उभारणे तसेच विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह बांधण्यासंदर्भातील प्रस्तावांचा यावेळी आढावा घेण्यात आला. विद्यार्थिनींच्या निवासाची वाढती गरज लक्षात घेता, ३२० विद्यार्थिनींची निवासक्षमता असलेल्या नवीन वसतिगृहासाठी सुधारित आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महाविद्यालयातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयाच्या उपाहारगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत नाश्ता केला आणि त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना उपाहारगृहात दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ नाश्ता उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
0000
काशीबाई थोरात/विसंअ

WhatsApp