
मुंबई, दि. ५ : बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासोबतच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची आणि गड-किल्ल्यांच्या समृद्ध परंपरेची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन तर्फे आयोजित किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत घाटकोपर (पूर्व) येथील एम.डी. भाटिया इंग्लिश मीडियम स्कूलने रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारत प्रथम क्रमांक पटकाविला. सायन येथील डी.एस. हायस्कूलने साकारलेल्या तातेगड सुंदरगड किल्ल्याला द्वितीय, तर गावदेवी येथील सेंट कोलंबा हायस्कूलने साकारलेल्या तोरणा किल्ल्याला तृतीय क्रमांक मिळाला.
महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई या शासकीय संस्थेतर्फे ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. बालकांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, तसेच त्यांचे जतन व संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त किल्ला बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मुंबईतील १७ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले. पाच विद्यार्थ्यांचा एक संघ याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आपल्या कल्पकतेचे, कलाकौशल्याचे आणि ऐतिहासिक वारशाविषयीच्या जाणिवेचे दर्शन घडविले.
स्पर्धेतील उत्तेजनार्थ पाच पारितोषिकेही जाहीर करण्यात आली. यामध्ये सेंट इग्नेशियस हायस्कूल, साने गुरुजी रोड, जेकॉब सर्कल (रायगड), चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, गिरगाव (रायगड), महिला मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, कुर्ला पश्चिम (सिंहगड), मॉडेल हायस्कूल, वाशी नाका (देवगिरी) आणि अरविंद गंडभीर हायस्कूल, जोगेश्वरी (प्रतापगड) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे परीक्षण बालश्री पुरस्कार विजेते सुमित पाटील आणि ओमकार वेजरे यांनी केले. जवाहर बालभवनच्या संचालिका नीता पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

00000
बी.सी.झंवर/विसंअ

WhatsApp