
- शेती हाच गावाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार; चार वॉर्ड, ८४४ कुटुंबे, २ हजार ४०० मतदार
नागपूर, दि. ७: ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची खरी ओळख ही गावांच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी जीवनातून दिसून येते. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा हे असेच एक गाव. शेतीला केंद्रस्थानी ठेवून ग्रामविकासाची वाटचाल करणाऱ्या या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नरखेड तालुक्यातील १९४८ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झालेल्या लोहारी सावंगा गावाने काळानुरूप विकासाचा प्रवास सुरू ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर या गावाची सामाजिक, आर्थिक आणि कृषी विषयक वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरत आहेत.

लोहारी सावंगा ग्रामपंचायतीची स्थापना १९४८ मध्ये झाली. सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 12 असून यात सात महिला तर पाच पुरुष सदस्यांचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ४ हजार २६४ आहे. यामध्ये २ हजार ४१४ पुरुष आणि १ हजार ८५० महिलांचा समावेश आहे. गावात एकूण ८४४ कुटुंबे असून, त्यापैकी ५९० कुटुंबे एपीएल आणि २५४ कुटुंबे बीपीएल प्रवर्गातील आहेत.गावाची प्रशासकीय रचना चार वॉर्डांमध्ये विभागलेली आहे.
लोहारी सावंगा गावाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती आहे. गावातील प्रमुख पिकांमध्ये कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, सोयाबीन, हरभरा आणि गहू यांचा समावेश होतो. पारंपरिक पिकांसोबतच फळबागांच्या माध्यमातूनही शेतीला उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विदर्भातील कृषी अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब या गावातील पीकपद्धतीतून दिसून येते.

गावामध्ये एकूण ८१० नळजोडणी खातेदार असल्याची नोंद आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. सन २०२६ च्या उपलब्ध नोंदीनुसार गावातील एकूण मतदारसंख्या २ हजार ४०० आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ ९७९.१९ चौरस हेक्टर आर आहे.
गावाचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून शेती, पाणीपुरवठा, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध घटकांशी जोडलेला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सिंचनाच्या सुविधा, शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहारी सावंगा भेटीच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांच्या अपेक्षा, ग्रामीण विकासाचे प्रश्न आणि शेतीसमोरील आव्हाने यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. गावाची ऐतिहासिक ग्रामपंचायत व्यवस्था, कृषीप्रधान अर्थव्यवस्था आणि सामाजिक रचना यांचा आढावा घेत ग्रामीण भागाच्या विकासाची दिशा अधिक व्यापक करण्याची संधी या भेटीच्या निमित्ताने निर्माण झाली आहे.
०००

WhatsApp