मंत्री संजय राठोड यांच्याकडून गल्लेबोरगाव व मेहगाव येथील प्रकल्पांची पाहणी व लोकार्पण – महासंवाद

    - Advertisement -

    छत्रपती संभाजीनगर, दि. १६ – राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव आणि कन्नड तालुक्यातील मेहगाव येथील विविध जलसंधारण प्रकल्पांची पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण उपाययोजनांच्या अनुषंगाने या प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या पाहणी दौऱ्यात गल्लेबोरगाव येथील द्वारयुक्त सिमेंट नाला बांध, मेहगाव येथील पूलवजा बंधारा तसेच पाझर तलाव क्रमांक 1 या प्रकल्पांचा समावेश होता. यावेळी पूल वजा बंधारा चे लोकार्पण ही मंत्री राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

     या दौऱ्यात आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव यांचीही उपस्थिती होती. तसेच मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

     गल्लेबोरगाव येथील बंधाऱ्यामुळे 16 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

     खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे चिंचोली नाल्यावर द्वारयुक्त सिमेंट नाला बांध उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याची लांबी २० मीटर, तर उंची २.५ मीटर आहे. प्रकल्पाची एकूण किंमत ८० लाख ८५ हजार रुपये असून, या ठिकाणचे पाणलोट क्षेत्र ४.९० चौरस किलोमीटर आहे. प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ४९.४७ हजार घनमीटर असून, या बंधाऱ्यामुळे परिसरातील १६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळू शकणार आहे.

     या प्रकल्पामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करणे शक्य होणार आहे. तसेच भूजल पुनर्भरणास चालना मिळून परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

     मेहगाव पाझर तलावातून 34 हजार 193 घनमीटर गाळ काढला

     कन्नड तालुक्यातील मेहगाव येथील पाझर तलाव क्रमांक १ चीही मंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. या तलावाची पाणी साठवण क्षमता २२१ हजार घनमीटर (TCM) असून, सिंचन क्षमता ४५ हेक्टर आहे.

     ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत या तलावातील साचलेला गाळ काढण्याचे काम प्रेरणा फाउंडेशन या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. सन २०२३–२४ मध्ये तलावातून २२ हजार ७३३ घनमीटर, तर सन २०२४–२५ मध्ये ११ हजार ४६० घनमीटर गाळ काढण्यात आला. अशा प्रकारे दोन वर्षांत एकूण ३४ हजार १९३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

     तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत झाली आहे. तसेच परिसरातील भूजल पुनर्भरणाला चालना मिळणार आहे. तलावातून काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत वापरण्यात आल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास आणि सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.

     मेहगाव येथील पूलवजा बंधाऱ्यामुळे दळणवळण व सिंचनाची सुविधा

     मेहगाव येथील अंजना नदीवर उभारण्यात आलेल्या पूलवजा बंधारा क्रमांक १ चीही मंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीतून मृद व जलसंधारण विभागामार्फत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कामासाठी १ कोटी ६८ लाख ६२ हजार रुपये खर्च करण्यात आला असून, सन २०२५–२६ मध्ये हे काम पूर्ण झाले आहे.

     या पुलाच्या स्लॅबची लांबी ३१ मीटर, तर रुंदी ६ मीटर असून, त्याला एकूण नऊ आधारस्तंभ आहेत. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९८.५७ हजार घनमीटर असून, सिंचन क्षमता ३२ हेक्टर आहे.

     या प्रकल्पामुळे गावातील शाळकरी मुलांना पावसाळ्यात नदी ओलांडून शाळेत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच नागरिकांची दैनंदिन वाहतूक सुलभ झाली असून, आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य व अन्य अत्यावश्यक सेवा गावापर्यंत पोहोचविणे अधिक सोयीचे झाले आहे.

     पूलवजा बंधाऱ्यामुळे नदीपात्रात पावसाळ्यातील पाणी अडवून साठविणे शक्य झाले आहे. त्यामुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळणार असून, परिसरातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.

     जलसंधारणातून दुष्काळ निवारणाला बळ

    गल्लेबोरगाव आणि मेहगाव येथील हे प्रकल्प जलसंधारण, भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ आणि ग्रामीण दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अधिकाधिक संचय करणे, भूजल पातळीत सुधारणा घडवून आणणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहेत.

     विशेषतः मेहगाव येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामामुळे जलसाठ्याचे पुनरुज्जीवन होण्यास मदत झाली आहे. तर पूलवजा बंधाऱ्यामुळे जलसंधारणासोबतच नागरिकांच्या सुरक्षित दळणवळणाची सुविधाही निर्माण झाली आहे.

    दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन, उपलब्ध जलस्रोतांचे बळकटीकरण आणि सिंचन सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांना विशेष महत्त्व आहे.

    00000

    - Advertisement -