पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी; राज्याला पाच राष्ट्रीय पुरस्कार – महासंवाद

    - Advertisement -

    • छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि परळी शहरांचाही राष्ट्रीय स्तरावर गौरव

    नवी दिल्ली, दि. २०: पथविक्रेत्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित ‘पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळ्यात महाराष्ट्र राज्याला दोन, तर छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि परळी या शहरांना प्रत्येकी एक असे एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अमोल येडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

    महाराष्ट्रातील तीन शहरांचा राष्ट्रीय गौरव

    कर्ज वितरणाच्या कामगिरीसाठी लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आलेल्या श्रेणींमध्ये छत्रपती संभाजीनगरने १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात तृतीय क्रमांक मिळविला. १ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात परभणीने, तर १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात परळीने प्रथम क्रमांक पटकावला.याशिवाय, पुनर्रचित पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम, तर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

    छत्रपती संभाजीनगरची उल्लेखनीय कामगिरी

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम स्वनिधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. महापालिकेला निर्धारित २३ हजार ५०२ पथविक्रेत्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४७ हजार ९५० पथविक्रेत्यांना प्रथम कर्ज वितरित करण्यात यश आले असून, २०४ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे. १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत शहरातील ६५ हजार ९१ पथविक्रेत्यांना एकूण १००.०५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच ३८ हजार ६९० पथविक्रेते डिजिटल व्यवहारांसाठी सक्रिय झाले आहेत. या कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात कर्ज वितरणासाठी तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

    पथविक्रेत्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना

    पीएम स्वनिधी योजनेची सुरुवात १ जून २०२० रोजी करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून देशातील सुमारे ८१ लाख पथविक्रेत्यांना आतापर्यंत १ कोटी २१ लाखांहून अधिक कर्ज वितरण करण्यात आले असून, त्याची एकूण रक्कम सुमारे २० हजार कोटी रुपये आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये केंद्र शासनाने योजनेची पुनर्रचना करून मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये कर्जमर्यादेत वाढ, पात्र लाभार्थ्यांसाठी यूपीआय संलग्न रुपे क्रेडिट कार्ड आणि योजनेची व्याप्ती निमशहरी भागांपर्यंत वाढविण्याचा समावेश आहे.

    स्वनिधी से समृद्धी उपक्रमांतर्गत पथविक्रेत्यांच्या कुटुंबांना केंद्र शासनाच्या विविध आठ कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत आहे. सुलभ कर्जपुरवठा, डिजिटल व्यवहार, आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षा यांच्या माध्यमातून पथविक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. महाराष्ट्राने या योजनेच्या अंमलबजावणीत मिळविलेले यश राज्याच्या शहरी विकास आणि पथविक्रेता सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली पावती आहे.

    0000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    - Advertisement -