पर्यावरण संवर्धनाचा संदेश आता थेट शाळकरी मुलांच्या दारी; महाराष्ट्रभर फिरणार पाच विशेष पर्यावरण रथ! – महासंवाद

    - Advertisement -

    • एआय चॅटबॉट,ॲनिमेशन आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती
    • कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा यशस्वी समारोप

    पंढरपूर, ता. २० : पर्यावरण संवर्धनाचे संस्कार लहान वयातच रुजवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेले पाच विशेष पर्यावरण जनजागृती रथ आता संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहेत. सौरऊर्जेवर चालणाऱ्या या पर्यावरण रथांचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. २८ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा यशस्वी समारोप उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

    यावेळी मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार राजू खरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, माजी आमदार शाहजीबापू पाटील, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष ॲड.प्रणिता भालके, जिल्हाप्रमुख चरणदास चवरे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या संकटांवर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. लहान मुलांची आकलनशक्ती उत्तम असल्याने त्यांच्यात बालवयातच पर्यावरणाचे संस्कार रुजवल्यास ती मुले आपल्या कुटुंबालाही पर्यावरण रक्षणासाठी प्रवृत्त करतील आणि भविष्यात या चळवळीची खरी ब्रँड ॲम्बेसेडर ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. हा उपक्रम राबवल्याबद्दल एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

    या रथामध्ये आकर्षक मॅस्कॉट, अॅनिमेटेड व्हिडिओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅटबॉटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाची माहिती दिली जाणार आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर, पाणी वाचवणे, वृक्षारोपण आणि विजेची बचत यांचे महत्त्व मनोरंजक पद्धतीने समजावले जाणार आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभागही वाढवला जाणार आहे.

    ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ या २८ वर्षांच्या उपक्रमातून भारूड, पोवाडा आणि कीर्तनाद्वारे पर्यावरणाचा संदेश दिला जात आहे. संत तुकाराम महाराजांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, संत ज्ञानेश्वर महाराजांचे निसर्गविषयक विचार आणि संत एकनाथ महाराजांचा निसर्गाच्या मर्यादा ओलांडल्यास विनाश होण्याचा संदेश आजही मार्गदर्शक आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मंत्री, खासदार किंवा लोकप्रतिनिधी नव्हे, तर पंढरपुरात येणारा वारकरी हाच खरा व्हीआयपी असून त्याची गैरसोय होता कामा नये, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

    वारकऱ्यांसाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. दहा लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः मोटारसायकलवरून पाहणी केल्याचे सांगत, ६० एकर परिसरात १० हजार कार्पेट, कचरापेट्या आणि फुलझाडांच्या कुंड्यांची व्यवस्था केल्याचे त्यांनी नमूद केले. स्वच्छतेसाठी मॉनिटरिंग यंत्रणाही कार्यरत आहे.

    वारीपुरत्या सुविधा न ठेवता कायमस्वरूपी विकास करण्यावर शासनाचा भर आहे. रेल्वेच्या जागेसाठी मुख्यमंत्री असताना केलेला पाठपुरावा, उपलब्ध जागेचे काँक्रिटीकरण, वृक्षारोपण आणि सुशोभीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सुरू असलेल्या विकासकामांसाठी २५ कोटी रुपयांचा शासन निर्णय तातडीने काढण्याच्या सूचना पर्यटन मंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. एमपीसीबीच्या डीप क्लीन ड्राइव्ह मशीनचे उद्घाटनही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ संकल्पनेप्रमाणे वृक्षारोपण वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. हवा आणि पाण्याचे प्रदूषण रोखणे, नद्या स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणपूरक विकास साधणे आवश्यक आहे. पांडुरंगाच्या भक्तीप्रमाणेच निसर्गाचीही भक्ती केली पाहिजे. वारी स्वच्छ, सुरक्षित, निर्मळ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

    वारकऱ्यांच्या साथीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातली फुगडी. कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या साथीने हातात टाळ चिपळ्या घेऊन पांडुरंगाचा गजर केला. तर यानंतर वारकऱ्यांच्या खास आग्रहास्तव त्यांनी आधी वारकऱ्यांच्या आणि नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या साथीने फुगडी घातली.

    0000

    - Advertisement -