
- ‘एनबीटी’, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
मुंबई, दि. २३ : विकसित भारताच्या उभारणीसाठी ज्ञानसमृद्ध, विचारशील आणि संवेदनशील नागरिक घडणे आवश्यक असून त्यासाठी समाजात वाचन संस्कृती रुजविणे गरजेचे आहे. ‘विकसित भारतासाठी विकसित वाचक घडवूया’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मुंबई विद्यापीठात पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकार), बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक (ऑनलाइन) झाली. या बैठकीला महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, आजच्या डिजिटल युगात तरुण पिढीचा मोबाईल आणि स्क्रीनवरील वाढता वेळ ही चिंतेची बाब आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर, सखोल विचार करण्याच्या क्षमतेवर आणि संवादकौशल्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या जगाशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तक वाचनामुळे केवळ ज्ञानात भर पडत नाही, तर चिंतनशीलता, कल्पनाशक्ती, चिकित्सक विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते.
‘वाचन ही केवळ आवड किंवा छंदाची बाब नसून ज्ञानसमृद्ध समाज घडविण्याची प्रक्रिया आहे. विकसित भारताचा पाया विकसित वाचकांमध्ये आहे. पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पुस्तके, साहित्य आणि विचारविश्वाशी जोडण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे,’ असे आवाहनही मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.
मुंबई पुस्तक महोत्सवात पुस्तक प्रदर्शनासोबतच साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध साहित्यप्रकार, लेखक, विचारवंत आणि ज्ञानशाखांचा परिचय करून घेण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याबरोबरच त्यांना समृद्ध वैचारिक अनुभव देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे.
या ऑनलाइन बैठकीला नॅशनल बुक ट्रस्टचे मिलिंद मराठे, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, तंत्रशिक्षण संचालक प्रमोद नाईक आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या महोत्सव भेटीचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी यावेळी केले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ

WhatsApp