बुलढाणा, दि. २५ (जिमाका): बदलत्या हवामान परिस्थिती आणि दुष्काळाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक व्यवस्थापनावर भर द्यावा. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती अधिक समृद्ध करावी. येणारा काळ हा शेतजमीनधारक शेतकऱ्यांचा असून, योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून अधिक उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हळद पिकाचे प्रभावी व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि हवामानातील बदलांनुसार शेतीचे नियोजन याबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून २४ नोव्हेंबर रोजी मेहकर येथील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
मेळाव्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. नितेंद्र कदम यांनी दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील विभागप्रमुख डॉ. हरिहर कोरसकर यांनी पीक व पाणी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच जिल्हा विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. झापे यांनी हळद पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्यासंदर्भातील उपाययोजना स्पष्ट केल्या.
एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर फळबाग पिकांचे हवामान अनुकूल व दुष्काळ प्रतिरोधक व्यवस्थापन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील उद्यानविद्या विषय विशेषज्ञ डॉ. अनिल तारू यांनी मार्गदर्शन केले. तर एल निनोची सद्यस्थिती आणि आगामी काळातील शेतीसमोरील हवामानविषयक आव्हाने या विषयावर जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील हवामानतज्ज्ञ मनीष यदुलवार यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या उद्देशाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी मार्गदर्शन केले. केवळ सैद्धांतिक माहितीपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक व्यवस्थापनाची माहिती मिळावी, यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेताच्या बांधावर जाऊन उत्कृष्ट हळद उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वाघ आणि तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यात हळद उत्पादकांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बदलत्या हवामान परिस्थितीत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शास्त्रीय पीक व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करण्याचा संदेश या शेतकरी संवाद मेळाव्यातून देण्यात आला.
०००००

WhatsApp