मुंबई, दि. २९ : जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासह धरणात मत्स्यबीज सोडण्याचा प्रस्ताव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावांचा मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीत संबंधित विषयांवरील तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासंदर्भातील पाणी वापर, सिंचन क्षेत्र, विविध उपसा सिंचन योजनांचा समावेश तसेच सुधारित नियोजनाची अंमलबजावणी करण्याबाबत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी आढावा घेतला. यासोबतच धरणातील मत्स्यबीज सोडण्याच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणीय, तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा विचार करून संबंधित विभागांनी समन्वयाने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन व जाफ्राबाद परिसरातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला. यासाठी आवश्यक सर्वेक्षण, तांत्रिक मान्यता व पुढील प्रशासकीय प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी निर्देश दिले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जलसंपदा प्रकल्पांचा अधिक परिणामकारक वापर, सिंचन क्षमता वाढ आणि स्थानिक गरजांनुसार प्रलंबित प्रस्तावांवर वेळेत निर्णय घेण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश दिले. यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार विलास भुमरे, आमदार प्रकाश सोळंके, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0000



















WhatsApp