मुंबई, दि. १ : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान विश्रांतीची सोय, गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई विमानतळाजवळ विलेपार्ले येथे प्रस्तावित ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असावे, अशा सूचना पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. अतिथीगृहात वाहनचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हांडे आदी अधिकारी उपस्थित होते. राजा अदारे आर्किटेक्ट यांच्याकडून प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री रावल यांनी आराखड्याची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.
प्रस्तावित अतिथीगृहाची इमारत चार बेसमेंटसह सहा मजली असणार आहे. यामध्ये रिसेप्शन, वेटिंग एरिया तसेच ४२ वाहनांच्या पार्किंगची सुविधा असेल. अतिथींसाठी एकूण ३९ खोल्या प्रस्तावित असून, त्यात एक्झिक्युटिव्ह सुइट आणि प्रेसिडेन्शियल सुइटचाही समावेश आहे.
पहिल्या मजल्यावर दोन कॉन्फरन्स रूम, एक बोर्ड रूम, मुख्य स्वयंपाकघर तसेच जनरल आणि प्रायव्हेट डायनिंगची सुविधा असेल. दुसऱ्या ते सहाव्या मजल्यावर अतिथींच्या निवासासाठी खोल्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मुंबई विमानतळाच्या जवळ असलेल्या या अतिथीगृहामुळे विविध राज्यांतून येणाऱ्या मान्यवरांना तसेच ट्रान्झिट प्रवासातील अतिथींना विमानतळाजवळच आरामदायी निवास आणि विश्रांतीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्या निवासाची सुयोग्य व्यवस्था, गोपनीयता आणि सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात यावे, असे मंत्री रावल यांनी सांगितले. रूफटॉपवर जिमची सुविधा उपलब्ध करून देतानाच इमारत हवेशीर आणि नैसर्गिक सूर्यप्रकाशाने परिपूर्ण असावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
अतिथींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहनचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीही याच इमारतीत स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मंत्री रावल यांनी दिले. प्रस्तावित अतिथीगृहाचा अंतिम आराखडा लवकर सादर करून बांधकामाची पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
0000
















WhatsApp