शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कापूस क्रांती अभियानाची समन्वयाने अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

- Advertisement -


मुंबई, दि. १:- कापूस हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, योग्य पीक व्यवस्थापन तसेच शास्त्रीय पद्धतींचा प्रभावी वापर आवश्यक आहे. या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत अभियानाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे र्निदेश कृषी, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन आणि विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.

कापूस क्रांती या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उपसचिव प्रतिभा पाटील, कृषी सह संचालक उदय देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, उत्पादकता व उत्पादन वाढवणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यास्तव कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक मार्गदर्शन व तंत्रज्ञान पोहोचविणे, उत्पादन क्षमतेत वाढ करणे आणि कापूस उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या निविष्ठा २०१७ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनानुसार कराव्यात. यामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या सहाय्याने कार्यशाळा घेण्यात आल्या असून २०२६- २०२७ च्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच या योजनेच्या माध्यमातून २०३०-२०३१ पर्यंत  १२५ लाख गाठी कापसाचे उत्पादन व ५५० किलो लिंट/हेक्टरी उत्पादकता साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

००००

एकनाथ पोवार/स.सं.

 

 



Source link

- Advertisement -