
शासकीय योजनांना ग्रामस्थांच्या सामूहिक इच्छाशक्तीची जोड मिळाली की परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होते. गावाच्या मातीशी असलेले नाते, निसर्गाप्रति असलेली बांधिलकी आणि सामूहिक श्रमांची ताकद यांचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील फळशेत ग्रामस्थांनी घडवून आणलेल्या जलसंधारण मोहिमेतून आला आहे. गावातील ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि मुंबईत वास्तव्यास असलेले गावकरी अशा सर्वांनी एकत्र येत करदा नदीवर जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण केले. दोन जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि एका नवीन वनराई बंधाऱ्याची उभारणी करून फळशेत ग्रामस्थांनी लोकसहभागातून ग्रामविकासाचा प्रेरणादायी वस्तुपाठ निर्माण केला आहे. सर्वांना एका माळेत गुंफण्यात फळशेत ग्रामस्थ आणि फळशेत मुंबई मंडळाच्या सर्व शिलेदारांनी मोलाचे योगदान दिले आहे, त्यांचे कौतुक करावे तितके कमीच!
‘एक दिवस गावासाठी, पाण्याचा थेंब न् थेंब जिरवण्यासाठी’

पाण्याचे महत्त्व ओळखून त्याच्या संवर्धनासाठी कृती करण्याचा निर्धार फळशेत ग्रामस्थांनी केला. ‘एक दिवस फळशेत गावासाठी, पाण्याचा थेंब अन् थेंब जिरवण्यासाठी’ हा संकल्प घेऊन रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता करदा नदी परिसरात विशेष श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामागे असलेले नियोजन आणि ग्रामस्थांची एकजूट. तब्बल महिनाभरापासून सुरू असलेल्या पूर्वतयारीला प्रत्यक्ष श्रमदानाची जोड मिळाली. फळशेत ग्रामस्थ आणि फळशेत मुंबई मंडळाच्या सुमारे ८० शिलेदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येत नदीवरील दोन जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली. त्याचबरोबर तिसरा नवीन वनराई बंधारा उभारण्यात आला.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास मदत व्हावी आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. गावाच्या जलसुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर सामूहिक प्रयत्न किती महत्त्वाचे ठरू शकतात, याचे उदाहरण या मोहिमेतून समोर आले.
संविधानिक कर्तव्याचे प्रत्यक्ष कृतीतून पालन
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भारतीय संविधानात वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याचे मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आले आहे. फळशेत ग्रामस्थांनी या संविधानिक कर्तव्याची जाणीव ठेवून जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान २.० तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत असा हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आला.
विशेष म्हणजे, जलसंधारणाबरोबरच पर्यावरणाचे संतुलन राखण्याचाही विचार करण्यात आला. बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूंना रोपांची लागवड करून परिसर हरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पाणी संवर्धन आणि वृक्षसंवर्धन या दोन्ही बाबींचा समन्वय साधण्यात आला.
मुंबईकर ग्रामस्थांचे गावाच्या विकासासाठी योगदान
फळशेतच्या या उपक्रमात मुंबईत वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. रोजगार आणि व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले असतानाही गावाशी असलेले नाते जपत फळशेत मुंबई मंडळाचे शिलेदार या मोहिमेत सहभागी झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या सदस्यांनी एकत्रितपणे नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. दिवाळीच्या सुट्ट्यांचा काळ असूनही अनेकांनी गावाच्या विकासासाठी वेळ दिला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही श्रमदानात सहभाग नोंदविला.
दुर्गम नदीकाठच्या परिसरात काम करणाऱ्या श्रमदात्यांसाठी भोजन आणि अन्य आवश्यक व्यवस्थाही करण्यात आली. श्री. यशवंत नाक्ती आणि बाईत मंडळी यांनी या व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. गावाच्या विकासासाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी केवळ श्रमदानच केले नाही, तर परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले.
तांत्रिक अचूकता आणि आर्थिक पारदर्शकतेवर भर
या मोहिमेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कामाच्या नोंदींमध्ये ठेवण्यात आलेली तांत्रिक अचूकता. शासकीय निकषांनुसार उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कामांची छायाचित्रे जीपीएस मॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आली. या छायाचित्रांचे जिओटॅगिंग करून कामाच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश नोंदविण्यात आले.
लोकसहभागातून झालेल्या कामाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला. उपक्रमासाठी झालेल्या खर्चाचा हिशोब व्यवस्थित ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी स्वीकारली. त्यामुळे लोकसहभागातून होणाऱ्या विकासकामांमध्ये तांत्रिक नोंदी आणि आर्थिक पारदर्शकतेचे महत्त्वही अधोरेखित झाले.
जलसंधारणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
‘माणूस, निसर्ग, पशू-पक्षी आणि वन्यजीव हेच जीवन’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून फळशेत परिसरात पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. विविध संदेशफलकांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन, पाण्याचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य दिले. स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन केल्यास भविष्यात गावाच्या पाणी उपलब्धतेला बळ मिळू शकते, या जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामविकासासाठी लोकसहभागाचा प्रेरणादायी वस्तुपाठ
फळशेत ग्रामस्थांचा हा उपक्रम केवळ जलसंधारणाच्या कामापुरता मर्यादित नाही. गावातील नागरिक, शहरात वास्तव्यास असलेले ग्रामस्थ, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी केलेला हा सामूहिक प्रयत्न आहे. शासकीय अभियानांची उद्दिष्टे लोकसहभागातून प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास स्थानिक पातळीवर विकासाची प्रभावी कामे उभी राहू शकतात, हे फळशेतच्या उपक्रमाने दाखवून दिले आहे. गावाच्या गरजा ओळखून स्थानिक साधनसामग्री, श्रमशक्ती आणि सामूहिक नियोजन यांच्या माध्यमातून विकासकामे करण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळते.
‘एक गाव, एक विचार, एक दिशा – पाणी अडवा, पाणी जिरवा!’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या फळशेत ग्रामस्थांनी जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गावाच्या विकासासाठी केवळ आर्थिक साधनेच नव्हे, तर सामूहिक इच्छाशक्ती, सामाजिक बांधिलकी आणि एकजूटही तितकीच महत्त्वाची असते. फळशेतच्या ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून हे अधोरेखित केले आहे. आपले गाव, आपली जबाबदारी आणि आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान, हाच फळशेतच्या जलसंधारण मोहिमेचा खरा संदेश आहे….!
‘सौजन्य: ग्रामपंचायत फळशेत कर्नाळा (ता. तळा, जि. रायगड)’
अमोल महाजन
माहिती अधिकारी (अ.का)
रायगड-अलिबाग
0000000

WhatsApp