
हिम्मत खचू देऊ नका; शासन तुमच्या पाठीशी
— पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी, दि. २४ : पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला आणि ‘हिम्मत खचू देऊ नका, संकटाच्या या काळात शासन तुमच्या पाठीशी आहे,’ असा धीर दिला.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी कुंडी (ता. सेलू), हदगाव (ता. पाथरी), सारोळा खु. (ता. पाथरी), सावळी (ता. मानवत), पोखर्णी (ता. परभणी), अकोली (ता. गंगाखेड), बोरी (ता. जिंतूर) येथे प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी शेतातील पिकांची अवस्था, पावसाची स्थिती आणि संभाव्य नुकसानीबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.
बांधावरच ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
पिकांवर खर्च केलेला पैसा, डोळ्यांत उभ्या केलेल्या अपेक्षा आणि पावसाअभावी हातातून निसटत चाललेले पीक… या साऱ्या वेदना शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे आस्थेवाईकपणे ऐकून घेतले. ‘तुमच्या अडचणी केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष बांधावर येऊन समजून घेणे गरजेचे आहे. तुमच्या नुकसानीची दखल घेऊन आवश्यक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता कमी करणे, त्यांच्या नुकसानीची दखल घेणे आणि त्यांना शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देणे, हीच प्राथमिकता आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पावसाच्या कमतरतेमुळे खरीप पिकांवर परिणाम झाल्याची पार्श्वभूमी असून, प्रशासनाने पीकस्थिती, पीकविमा, पाणी व चारा उपलब्धतेसह संभाव्य टंचाईच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. संकट मोठे आहे; मात्र शेतकरी एकटा नाही, शासन त्याच्या पाठीशी आहे, हा विश्वास देत पालकमंत्र्यांची बांधावरची ही भेट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली.
पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांच्यासह संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या दुःखात सहभागी होण्याची भूमिका घेत पालकमंत्र्यांनी दिलेला हा धीर, संकटाच्या काळात शासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला. शासनाच्या निर्देशानुसार पिकांचे नुकसान आणि परिस्थितीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या प्रक्रियेलाही यामुळे गती मिळणार आहे.

WhatsApp