बोरपाडा येथे ‘लोकसंवाद-२०२६’ अभियान उत्साहात संपन्न – महासंवाद

    - Advertisement -

    नंदुरबार,दि.१९(जिमाका ): शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती अभियानांतर्गत बोरपाडा (ता.नवापूर) येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

    ‘लोकसंवाद-2026’तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत बोरपाडा येथे आयोजित या कार्यक्रमास सरपंच जयराम कुवर (दापुर), उपसंरपच काशिराम गावित (बोरपाडा), एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे, उप कृषी अधिकारी राहुल शिरसाट, ग्राम विकास अधिकारी गणेश गावित, ग्राम महसूल अधिकारी भाईदास पावरा, पोलीस पाटील ओरस गावित, ग्रामरोजगार सहायक योसेफ गावित, सुरेश गावित, यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

    शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शबरी आवास घरकुल योजना,न्युक्लिअरस बजेट, ठक्कर बाप्पा पायाभूत सुविधा योजनेची माहिती दिली.

    ग्रामविकास अधिकारी गणेश गावित यांनी राज्य शासनावतीने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोंबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान तसेच 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत लोकसंवाद 2026 अभियान राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यात प्रधानमंत्री आवास योजना, विकसित भारत रोजगार आणि आजीविका योजना (व्ही.बी.जी राम जी), स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन योजनाची माहिती दिली.

    उप कृषी अधिकारी राहुल शिरसाट यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये फळबाग लागवड योजना, महाडीबीटीअंतर्गत कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजना, ॲग्रीस्टॅक नोंदणी, ईपीक नोंदणी कशी
    करावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

    ग्राम महसूल अधिकारी भाईदास पावरा यांनी सातबारा वरुन नाव कमी करणे, संजय गांधी योजना, सातबारा नाव दुरुस्ती, सातबारा उतारावर नावे लावणे अशा महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

    यावेळी कृषी, महसूल, ग्रामविकास व आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत पात्र नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज प्रक्रिया याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. उपसंपादक संदीप गावित यांनी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थ, शेतकरी, व नागरिक उपस्थित होते.

    ००००

    - Advertisement -