‘अमृत-२’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    - Advertisement -

    नागपूर, दि. १९: रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणाच्या निकृष्ट कार्यपद्धतीवर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ‘अमृत २’ अंतर्गत सुरू असलेले सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    शहरात ‘अमृत २’ योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी  शासकीय निवासस्थानी आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगरसेवक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    बैठकीदरम्यान ‘अमृत २’ योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम व त्यानंतरच्या पुनर्भरण (restoration) कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील खोदकाम व पुनर्भरणच्या कामाबद्दल समस्या मांडल्या, तसेच नगरसेवकांनी रिंग रोड वरील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरू असलेल्या कामाबद्दलही रोष व्यक्त केला. यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी पावसळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

    यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिमेंट रस्त्यांवर पुनर्भरण किंवा खड्डे बुजविण्याचे काम करताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीचा (Scientific Method) सक्तीने अवलंब करण्यात यावा, असे निर्देश दिले. तसेच, भविष्यात शहरात होणाऱ्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण प्रक्रियेसंदर्भात संबधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून एक सर्वसमावेशक व कडक ‘धोरण’ तयार करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांवर सक्त कारवाईची ताकीदही त्यांनी दिली. याशिवाय सर्व कामांसाठी संबधित विभागांनी योग्य समन्वय साधून कार्य करण्याचे सुचाविले.

    बैठकीत सर्वप्रथम मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी संगणकीय सादरीकरण करीत ‘अमृत २’ योजनेच्या कामांसोबतच आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन प्रकल्पावरही सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट(एसटीपी) बद्दलची माहिती सादर केली. तसेच, जयताळा येथे १० एमएलडी, चिखली येथे ३५ एमएलडी एसटीपी उभारण्यात येणार असून, चिंचभवन, बीडीपेठ, सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

    ०००

    - Advertisement -