
नांदेड , दि.२४ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सुविधा व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नांदेड शहरातील मारवाडी गल्ली येथील श्री राजस्थानी नवयुवक गणेश मंडळ येथे लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यम अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड, उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचतगटांना उपलब्ध होणाऱ्या कर्जाची सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकसंवादाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, सुविधा व विविध उपक्रमांची माहिती नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी आणि पात्रतेनुसार उपलब्ध शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक चंद्रकांत कारभारी यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यम अधिकारी मिलिंद व्यवहारे, रामकिशन तोकले, श्री राजस्थानी नवयुवक गणेश मंडळाचे अध्यक्ष नीरज शर्मा, पदाधिकारी हेमंत शर्मा, रेखा शर्मा, संगीता शर्मा, चंदा शर्मा, पूजा मोदी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
000

WhatsApp