
ठाणे,दि.२४: सार्वजनिक गणेशोत्सवाचे मूळ उद्दिष्ट असलेल्या लोकशिक्षणाचा आणि जनजागृतीचा वसा जपत, अंबरनाथमध्ये सामाजिक आणि आर्थिक प्रबोधनाचा एक अत्यंत सकारात्मक अध्याय लिहिला गेला. माहिती व जनसंपर्क विभागाच्या महत्त्वाकांक्षी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा भाग म्हणून, जिल्हा अग्रणी बँक (ठाणे) यांच्या वतीने अंबरनाथ येथील नामांकित ‘दीपक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ येथे विशेष आर्थिक साक्षरता व शासकीय योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रशासकीय यंत्रणा, बँकिंग क्षेत्र आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यातील प्रभावी ‘टीमवर्क’ मुळे बाप्पाच्या दरबारात थेट पोहोचलेल्या या उपक्रमामुळे नागरिक, तरुण वर्ग आणि महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसून आला असून, एकाच छताखाली परिपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल भाविकांनी मनापासून समाधान व्यक्त केले आहे.
स्थानिक पातळीवर तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत बँकिंग सेवा आणि कल्याणकारी योजना पोहोचाव्यात या उद्देशाने ठाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.अभिषेक पवार यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. केवळ बँकेच्या चार भिंतींत मर्यादित न राहता, उत्सवाच्या गर्दीत थेट लोकांपर्यंत पोहोचण्याच्या या कल्पक नियोजनामुळे गणेश मंडपाचे रूपांतर एका चैतन्यमय ज्ञानकेंद्रात झाले. या वेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना आर्थिक साक्षरता प्रशिक्षक श्रीमती संगीता ससाने यांनी दैनंदिन जीवनातील बचतीचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. लहान-मोठ्या बचतीतून कुटुंबाचे भविष्य कसे सुरक्षित करता येते, यावर प्रकाश टाकत त्यांनी केंद्र व राज्य शासनामार्फत बँकांद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध सवलतीच्या कर्ज योजनांची सविस्तर मांडणी केली. यामुळे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि बचत गटांच्या महिलांना नवी दिशा मिळाली.
या मार्गदर्शन सत्रात समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक संरक्षण देणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रमुख सामाजिक सुरक्षा योजनांवर विशेष भर देण्यात आला. यामध्ये ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (अपघात विमा), ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (जीवन विमा), वृद्धापकाळाची हमी देणारी ‘अटल पेन्शन योजना’ तसेच बँकिंग प्रवाहात प्रत्येकाला सामावून घेणारी ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ या सर्व योजनांचे निकष, अल्प प्रीमियम आणि थेट मिळणारे लाभ याविषयी श्रीमती ससाने यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल सुरक्षिततेचा कानमंत्र या वेळी नागरिकांना देण्यात आला. ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी (OTP) किंवा गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करणे आणि डिजिटल फसवणूक (Digital Fraud) टाळण्याचे उपाय उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने मदत मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
यासोबतच, बँकिंग सेवेबाबत काही तक्रार अथवा त्रुटी राहिल्यास ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लोकपाल योजने’अंतर्गत (RBI Ombudsman Scheme) ऑनलाइन व अधिकृत तक्रार कशी नोंदवावी, याचेही प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक आणि दीपक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्यात दिसून आलेला समन्वय आणि उत्तम ‘टीमवर्क’ या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. एरवी शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; मात्र अशा रीतीने देवदर्शन घेतानाच आयुष्याला आर्थिक शिस्त आणि सुरक्षितता देणारे मार्गदर्शन घरबसल्या मिळाल्याने भाविकांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.अभिषेक पवार आणि प्रशिक्षक श्रीमती संगीता ससाने यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या अनोख्या ‘लोकसंवाद’ने धार्मिक उत्सवांना सामाजिक उत्तरदायित्वाची एक सशक्त आणि दिशादर्शक जोड दिली आहे.
०००००

WhatsApp