
नवी दिल्ली, दि. १५ : वाचन हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक समृद्धी आणि जीवनात योग्य परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे वाचनसंस्कृतीचा अधिकाधिक प्रसार होणे समाजाच्या हिताचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या येथील निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी आज येथे केले.
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. श्वेता सिंघल बोलत होत्या. त्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यांची यावी उपस्थिती होती. यावेळीउपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. वाचनाचे महत्त्व, ग्रंथसंस्कृतीची जोपासना आणि पुस्तकांमधून होणारी वैचारिक समृद्धी याविषयी मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले.
डॉ. कलाम यांचे साहित्य वाचून त्यांचे विचार आत्मसात करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगून डॉ. सिंघल यांनीआपल्या वाचनानुभवांना उजाळा दिला. बालपणी शालेय ग्रंथालयातून पुस्तके आणून वाचण्याच्या आठवणी सांगून त्या म्हणाल्या, वयानुसार आणि जीवनानुभवांतून पुस्तकांतील विचारांचा अर्थ अधिक सखोलपणे उमगत जातो. डिजिटल युगात मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी स्वतः वाचनाची सवय जोपासावी आणि मुलांना दर्जेदार पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यार्थी आणि तरुणांनी डॉ. कलाम यांची ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इग्नायटेड माइंड्स’ आणि ‘मिशन इंडिया’ ही पुस्तके आवर्जून वाचावीत. खालिद हुसेनी यांच्या ‘अ थाउजंड स्प्लेंडिड सन्स’ आणि सोनी कंपनीचे सहसंस्थापक अकिओ मोरिटा यांच्या ‘मेड इन जपान’ या पुस्तकांचा उल्लेख करुन त्यांनी संघर्षाचा सामना करण्याचे धैर्य, उद्योजकता आणि नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले.
पत्रकार प्रशांत वाघाये यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांतील विचारांवर चर्चा घडवून आणण्याची आवश्यकता व्यक्त केली. मुंबईच्या डबेवाल्यांच्या कार्यपद्धतीचा संदर्भ देत त्यांनी शिस्त, अचूकता आणि समन्वयाच्या बळावर जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येते, असे सांगितले. कामाप्रती प्रामाणिकपणा महत्त्वाचा असून पुस्तकांवरील चर्चा केवळ वाचन प्रेरणा दिनापुरती मर्यादित न ठेवता दर महिन्याला आयोजित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार सोमेश कोळगे यांनी पुस्तकांचे महत्त्व, ग्रंथसंग्रहाचे वर्गीकरण आणि पुस्तकांचे जतन याविषयी विविध अनुभव कथन केले. पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या ग्रंथसंग्रहाचे जतन कसे करावे आणि त्यातील ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत कसे पोहोचवावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. डिजिटल माध्यमांतून वाचन सुलभ झाले असले, तरी छापील पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद आणि त्याचे वेगळेपण कायम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आहारविषयक पुस्तकांच्या वाचनातून योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीविषयी शास्त्रीय माहिती मिळवता येत असल्याचे स्पष्ट करून श्री नितीन शेंडे म्हणाले, जाहिराती आणि परदेशी आहारसंस्कृतीच्या प्रभावाखाली आहाराची निवड करण्याऐवजी शास्त्रीय माहितीच्या आधारे संतुलित आहाराचा अंगीकार करावा.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी प्रास्ताविकातून वाचनसंस्कृतीचे महत्त्व विशद केले. फ्रान्सिस बेकन यांच्या वाचनविषयक विचारांचा संदर्भ देऊन ते म्हणाले, जगाचा इतिहासात सर्वाधिक महत्त्वाचा शोध हा छापखान्याचा आहे. पाचशे वर्षांपूर्वी छापखानातून प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांनी विचार प्रवर्तक समाज घडवला.त्यातून युरोपात प्रबोधन युग अवतरले. या प्रबोधन युगाचा परिणाम म्हणून आधुनिक क्रांती घडली आणि मानवी जीवन सुखकर झाले.वाचनाला चिंतनआणि व्यासंगाची जोड दिल्याने हे सारे घडले.
या कार्यक्रमास अभियंता प्रमोद पाटील, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमेश कोळगे यांनी केले. तर महाराष्ट्र सदनच्या व्यवस्थापक सारिका शेलार यांनी आभार मानले.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली,

WhatsApp